राज्यात दिवसेंदिवस दिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, आता आकडा ३० ते ४० हजारच्या घरात पोहोचला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १० एप्रिलपर्यंत हा आकडा आणखी वाढून ६० ते ६५ हजारांच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सातत्याने वाढणारी ही आकडेवारी राज्य सरकारची डोकेदुखी वाढणारी ठरणार आहे.
ग्रामीण भागातही वाढले रुग्ण
एकीकडे शहरी भागात रुग्णसंख्या वाढत असताना, ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण वाढत आहेत. याचमुळे ग्रामीण भागात ई-आयसीयूवर भर देण्यात यावा, अशा सूचना टास्क फोर्सने केल्या आहेत. एवढेच नाही तर राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीतही येत्या १० दिवसांमध्ये राज्यात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्सची टंचाई जाणवण्याची भीती व्यक्त केली आहे. जर रुग्णसंख्या वाढत गेली आणि बेड्स पुरेसे उपलब्ध नसतील तर राज्यातील मृत्यूचा दर देखील आणखी वाढू शकतो. त्यातच ही दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे.
(हेही वाचाः मुंबईत मृत्यूचा आकडा झाला दोन अंकी!)
लोकांची हलगर्जी, कोरोनाला संधी
गर्दी टाळा, मास्क लावा असे सरकारच्यावतीने वारंवार सांगितले जात असताना देखील नागरिक नियम पाळत नाहीत. ही लोकांची हलगर्जीच कोरोना रुग्ण वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. एवढेच नाही तर जर लोकांचा निष्काळजीपणा असाच राहिला तर कोरोना आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत राज्यांत २२७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २८ लाख १२ हजार ९८० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २४ लाख ७२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा ५४ हजार ६४९ झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे ३ लाख ५६ हजार २४३ सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.