- खास प्रतिनिधी
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचे धागेदोरे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडून त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विचार सुरू झाला असून मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यास ती नामुष्की कुणाची असेल? सरकारमधील प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मुंडे यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांची? असा सवाल केला जात आहे.
कराडचा आका
देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख संशयित वाल्मिक कराड याला अटक झाली. त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक असल्याने मुंडे यांच्याकडेही संशयाने सुई रोखली जात आहे. देशमुख हत्येच्या निमित्ताने बीडमधील गुंडगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात असून भाजपाचे आमदार सुरेश धस तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे यांच्याकडे बोट दाखवले आहे. कराड हा एक प्यादा असून त्याचा ‘आका’ म्हणजेच धनंजय मुंडे यांचे नाव या प्रकरणात घेतले जात आहे.
(हेही वाचा – Dr. Bhau Daji Lad Museum : इतिहास, वारसा समजण्यासाठी संग्रहालयांची भूमिका मोलाची)
अजित पवार यांचा राजीनामा
देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी सुरू झाली असून ती निष्पक्ष व्हावी यासाठी मुंडे यांच्या मंत्रीपदावर गदा येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अंजली दमानिया यांनी तर अजित पवार यांचे उदाहरण दिले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, यांची आठवण करून देत दमानिया यांनी मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे.
अजित पवार अडचणीत?
मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला, अशी अफवाही दोन-तीन दिवसांपूर्वी उठली होती. त्यावर मुंडे यांनी खुलासा करत आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, मुंडे यांच्या राजीनाम्यावर वरिष्ठ पातळीवर विचार सुरू असून लवकरच त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास ही नामुष्की स्वच्छ चारित्र्य समजल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर की मुंडे यांचे पक्षप्रमुख अजित पवार यांच्यावर असा सवाल केला जात आहे. एक मात्र नक्की की मुंडे यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community