ठाणे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख आनंद दिघे यांच्या नावाची जादू त्यांच्या मृत्यू पाश्चात्य अजूनही कायम आहे. त्यांच्या जीवनावर आधारलेला ‘धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, त्याचे हे प्रमाण आहे. मात्र जगातील महान व्यक्तींचे आकस्मात निधन किंवा अपघाती निधन होते, तेव्हा साहजिकच त्याविषयी शंका निर्माण होते. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे निधन झाल्यानंतर संशय निर्माण झाला होता, तो २१ वर्षांनंतर आजही कायम आहे.
धर्मवीर चित्रपट, चर्चा मात्र दिघेंच्या मृत्यूची
आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी अनेक चर्चा सुरू आहेत. परंतु त्यावर पूर्णविराम लागलेला नाही. काही जणांच्या म्हणण्यानुसार हा अपघात होता, तर काही जण घातपात असल्याचा दावा करतात. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे आज जेव्हा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी जात आहेत, तिथे त्यांना दिघे यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हा प्रश्न विचारला जात आहे. अशाच एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, ‘त्यांच्या मृत्यूबद्दल विविध चर्चा लोक करतच असतात. त्यांच्या पायाला अपघात झाला होता. पण निदान झालं की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघेसाहेब गेल्यामुळे आमचं खूप नुकसान झालं, पक्षाचं नुकसान झालं, संघटनेचं नुकसान झालं. दिघेसाहेब एका दिवसात दोन दिवसांचं काम करायचे. बाळासाहेबही त्यांना सांगायचे की आनंद तू प्रकृतीची काळजी घे. हार्टअटॅक आला, आजारी होते, तेव्हा ते देवीच्या मिरवणुकीत गेले. बाळासाहेबांनी थांब म्हणून सांगितलं होतं. पण काय त्यांची दैवी शक्ती होती. ‘
(हेही वाचा राजकीय सभांना आता टीझरचे वेड! बुस्टर नाही तर मास्टर, शिवसेनेच्या सभेआधी भाजपवर वार )
शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य केले समर्पित
राजकारणात काम करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी तुम्ही एखाद्या राजकीय घरातच जन्म घेण्याची आवश्यकता नाही, हे आनंद दिघे यांनी सिद्ध करून दाखवले होते. दिघे यांनी शिवसेनेत काम सुरू केले आणि त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य त्यांनी अक्षरशः गुंडाळून ठेवले. पक्षाच्या कामासाठी वेळ देता यावा म्हणून त्यांनी आई-भाऊ-बहीण असा परिवार असलेले घर सोडले, ठाण्यात त्या काळी तयार करण्यात आलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयात ते राहायला गेले होते. शिवसेनेचे इतर कार्यकर्ते हे त्यांना जेवणाचा डबा आणून द्यायचे. शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दिघे यांच्या मनात इतकी समर्पण भावना होती की, त्यांनी लग्न सुद्धा केले नाही.
दिघेंचा प्रवास थांबवला?
धर्मवीर आनंद दिघे यांची वाढती लोकप्रियता बघून २००१ मध्ये त्यांचा प्रवास थांबण्यात आला का? हे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत. २६ ऑगस्ट २००१ रोजी आनंद दिघे यांच्या मृत्युमुळे शिवसैनिक इतके अस्वस्थ झाले होते की, त्यांनी अख्खे सुनितीदेवी सिंघनिया हे ठाण्यातील रुग्णालय जाळले होते. ही घटना समर्थनीय नसली तरी यातून आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम होते, हे लक्षात येते. आनंद चिंतामणी दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५१ रोजी टेंभी नाका, ठाणे येथे झाला होता. १९६६ साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा आनंद दिघे हे किशोरवयीन होते. शिवसेना स्थापन झाल्यानंतर ठाण्यात झालेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा त्यांनी ऐकली आणि आपण शिवसेना पक्षात सामील व्हायचे असे त्यांनी मनोमन ठरवले. किमान वयाची मर्यादा पूर्ण केल्यानंतर ७०च्या दशकात ते शिवसेनेचे सक्रिय सदस्य झाले.
(हेही वाचा राज्यातील महापालिका निवडणुका दोन टप्प्यात! मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका कोणत्या टप्प्यात?)
Join Our WhatsApp Community