भाजपाला फटका न बसता उद्धवसेनेला टक्कर देईल, अशा उमेदवाराचा शिंदे गटाकडून शोध

138
अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, भाजपा विरुद्ध उद्धवसेना असा सामना रंगणार आहे. असे असताना आता शिवसेनेच्या शिंदे गटानेही आपला उमेदवार मैदानात उतरविण्याचे नियोजन सुरू केल्याचे कळते.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. शिवाय या निवडणुकीत शिवसेना हे एकल नावही वापरता येणार नाही. मात्र, शिवसेनेवर दावा सांगणाऱ्या शिंदे गटाने अंधेरीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद उद्धव गटाकडून निवडणूक आयोग आणि न्यायालयात केला जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात वर्षा बंगल्यावर रविवारी रात्री खलबते झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपाला फटका न बसता उद्धव गटाची मते फोडेल असा उमेदवार शोधा, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी प्रमुख नेत्यांना केली आहे. त्यानुसार मुंबईस्थित नेत्यांनी तयारी सुरू केल्याचे कळते.

फडणवीस घेणार अंतिम निर्णय

अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाने उमेदवार देणे गरजेचे आहे का, यासंदर्भातील कायदेशीर बाजू पडताळल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेणार आहेत. त्याआधी संभाव्य उमेदवार शोधून ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सोमवारी १० ऑक्टोबरला सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महानगर प्राधिकरणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. या बैठकीनंतर दोघांमध्ये अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.