एमएमआरडीएने बांधून महापालिकेला हस्तांतरीत केलेल्या स्कायवॉकवर आता अधिक खर्च होऊ लागला आहे. काही ठिकाणी स्कायवॉकच्या वापराचा गैरवापर होत असल्याने त्या तोडून टाकण्याची मागणी होत आहे, काही ठिकाणी हे स्कायवॉक दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. मात्र, आतापर्यंत केलेल्या खर्चात अधिकच वाढ होत असल्याने आता हे स्कायवॉक महापालिकेसाठी सफेद हत्तीच असल्याचे बोलले जात आहे.
स्कायवॉक पाडून त्याजागी भुयारी मार्ग बांधण्याची मागणी
उत्तर मुंबईतील गोरेगाव पश्चिम, कांदिवली पूर्व, बोरीवली पश्चिम, दहिसर पूर्व आणि दहिसर पश्चिम भागातील स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी १३.६२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. यासाठी निवड केलेल्या कंत्राटदाराने या स्कायवॉकच्या खर्चात आणखी अडीच कोटी रुपयांची वाढ दर्शवली आहे. त्यामुळे या स्कायवॉकच्या दुरुस्तीवर होणारा १३.६२ कोटींचा खर्च हा १६.११ कोटींवर पोहोचला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी शीव येथील स्कायवॉकवरून एकही माणूस जात नाही. त्याचा वापर होत नसल्याने ते पाडून त्याजागी भुयारी मार्ग बांधण्याची यावा, अशी मागणी केली आहे. तर भाजपच्या विलेपार्ले येथील नगरसेविका ज्योती अळवणी यांनी प्रभाग ८२ व ८३ ला जोडणाऱ्या स्कायवॉकचा वापर मोठ्या प्रमाणात नागरीकांकडून केला जातो. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. यावर लावलेल्या जाहिरातींमुळे लोकांना त्रासही होत असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा : अवघ्या दहा हजारांमध्ये मिळतेय उत्तुंग इमारतींना ‘फायर’ प्रमाणपत्र)
श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्कायवॉक हे सफेद हत्ती असल्याचे सांगत २००८मध्ये शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून आणलेली ही संकल्पना आहे. त्यांनी बांधून महापालिकेला हस्तांतरीत केल्या. परंतु या स्कायवॉकला लोकांचा तीव्र विरोध आहे. पण जिथे जास्त वापर आहे, तेथील दुरुस्ती व्हायला हवी. पण जिथे वापरच नाही, त्यावरील दुरुस्तीवर अधिक खर्च करू नये, असे सांगत यावरील सर्व स्कायवॉकचा वापर व खर्चाची एक श्वेतपत्रिका काढली जावी, अशी मागणी केली. भाजपचे विनोद मिश्रा यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून याचा पाहणी अहवाल तयार करायला हवा असे सांगितले. तर भाजपचे कमलेश यादव यांनी स्कायवॉकमुळे लोकांचा त्रास कमी झालेला नाही. भिकाऱ्यांचा त्रास तेथे वाढला असून कोणत्याही प्रकारची सुरक्षाही नाही. त्यामुळे स्कायवॉकवर खर्च करायचे असेल तर लोकांच्या सुरक्षेसाठी माणसे नेमा अशी सूचना त्यांनी केली. शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी बोरीवली भागातील स्कायवॉकचा वापर लोकांकडून होत असून येथील फेरीवाल्यांवर आळा घालण्याची मागणी त्यांनी केली. फेरीवाले, भिकारी आणि गर्दुल्ले आदींना याठिकाणी मज्जाव करण्यात यावा, अशीही मागणी पाटेकर यांनी केली. त्यामुळे याची गंभीर दखल प्रशासनाने घेवून याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश स्थाय समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
Join Our WhatsApp Community