अंबानी प्रकरणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख उत्तम काम करत आहेत, या प्रकरणात कुणाचेही नाव आले तरी गय केली जाणार नाही. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा नंतर आली, त्या आधी राज्याचे पोलीस आणि एटीएसने तपास केला. सचिन वाझे यांना सरकारने आधी पदावरून हटवले होते, असा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंबानी प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस यांचे कौतुक केले.
एका पोलीस उपनिरीक्षकामुळे सरकार अडचणीत येत नाही!
मंगळवार, १६ मार्च रोजी दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर, तर दिल्लीला एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरु होते, त्यावर पत्रकारांनी ‘सचिन वाझे हे शिवसेनेशी निगडित होते, उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते, त्यामुळे सरकार अडचणीत येणार का’, असा प्रश्न विचारला असता, एका पोलीस उपनिरीक्षकामुळे सरकारला अडचण येत नाही, असे पवार म्हणाले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री करतील, त्यावर ते भाष्य करू शकतात. मी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी राज्याच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करत असतो, त्यात कुणाची बदली करायची यावर चर्चा करत नाही, असेही ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा : शिवसेनेची ‘ती’ प्रकरणे आता नितेश राणे बाहेर काढणार?)
एनआयएवर विश्वास!
दरम्यान या प्रकरणात आता राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा तपास करत आहे. तेव्हा त्यावर आपण काही भाष्य करू इच्छित नाही. एनआयएला तपासासाठी स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. कुणीही पदाचा गैरवापर केला असेल तर ते बाहेर आलेच पाहिजे, असेही पवार म्हणाले.
देशात तिसरी आघाडी उभारण्याची गरज!
सध्या भाजपच्या विरोधात देशात मजबूत तिसरी आघाडी उभारण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव कुणी आणला तर आपण त्याचे स्वागतच करू. मात्र यात काँग्रेस अपयशी ठरली का, हा विषय आपला येत नाही. केरळ विधानसभा निवडणुकीत आम्ही डाव्या आघाडीसोबत आहोत आणि निवडणुकीत डावी आघाडी जिंकून यावी याकरता आमचे प्रयत्न असणार आहेत, असेही पवार म्हणाले. केरळमधील पी.सी. चाको यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून एनसीपीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Join Our WhatsApp Community