गटविमा योजना शिवसेनेने बंद ‘करून दाखवली’! नितेश राणेंचा घणाघात  

नितेश राणे यांनी यासंबंधी पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

100

जे खरे कोविड वॉरीअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात?आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का?, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?, असा खरमरीत प्रश्न विचारला.

कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका! 

नितेश राणे यांनी यासंबंधी पत्रच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि १ एप्रिल २०११ सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. १ ऑगस्ट २०१५ साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात ०१ऑगस्ट २०१७ ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. आपल्याला हस्ते शुभारंभ केलेली योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे, असेही आमदार राणे म्हणाले.

(हेही वाचा : ‘लालबागचा राजा’च्या दरबारी पोलिसांची पत्रकारांवर दंडुकेशाही!)

बंद पडलेल्या योजनांचे श्रेय घ्या!

सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या अर्थकारणासाठी खेळू नये. आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वत:च्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. त्याचप्रमाणे आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेत कोविडमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे उदाहरण म्हणून ‘मुंबई मॉडेल’ चीही जगभर वाहवा ‘मिळवून’ घेतात, असे म्हणत केलेल्या कामाचे श्रेय घेता, मग बंद पडलेल्या योजनांचं काय?, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.