‘त्या’ कंत्राटदारावर मुंबई महापालिका मेहेरबान! का? वाचा…

चौरस मीटरचा दर महापालिकेच्या दरापेक्षा पाच ते सहा हजार रुपयांनी अधिक असून, महापालिकेच्या अंदाजित रक्कमेपेक्षा दोन ते अडीच पट अधिक दराने देण्याचा घाट घातला आहे.

150

मुंबई महापालिकेच्यावतीने आश्रय योजनेंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाच्या कामांसाठी ठाणे महापालिकेतील कंत्राटदाराने मजल मारली आहे. ठाणे महापालिकेत कंत्राट मिळवणाऱ्या मेसर्स शायोन कॉर्पोरेशन कंपनीने शहरांतील १२ सफाई कामगारांच्या वसाहतींमधील इमारतींच्या पुनर्विकासाचे काम मिळवले आहे. ठाणे महापालिकेत सुमारे १०० ते १५० कोटींची कामे करणाऱ्या या कंपनीला मुंबई महापालिकेने सुमारे १३०० कोटी रुपये आणि विविध करांसह सुमारे १७०० कोटी रुपयांची कामे बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे चौरस मीटरचा दर महापालिकेच्या दरापेक्षा पाच ते सहा हजार रुपयांनी अधिक असून, महापालिकेच्या अंदाजित रक्कमेपेक्षा दोन ते अडीच पट अधिक दराने देण्याचा घाट घातला आहे.

९२९ कोटींचे कंत्राट

मुंबई महापालिकेने गट क्रमांक तीन मध्ये दादर पूर्व येथील गौतम नगर, शीव अँटॉप हिलमधील सरदार नगर, कल्पक प्लॉट, शीव रावळी ट्रान्झिट कॅम्प, ना.म. जोशी मार्ग, माहिम प्लॉट आणि वरळीतील शिश महल या सात वसाहतींमध्ये सध्या ५७० सदनिका असून, त्याठिकाणी ३०० चौरस फुटाच्या ३४० आणि ६०० चौरस फुटाच्या ४० सदनिका महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केल्या होत्या. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये शायोन कॉर्पोरेशन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीने ३०० चौरस फुटाच्या २१३४ सदनिका आणि ६०० चौरस फुटाच्या ३१७ बांधून देण्याचे प्रस्तावित केले. यासाठी महापालिकेने १९९ कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु कंत्राटदाराने याच्या बांधकामाची बोली ७०४ कोटी एवढी लावली असून, विविध करांसह ही रक्कम ९२९.२६ कोटी रुपये एवढी जात आहे.

(हेही वाचाः म्हाडानंतर आता बी.जी.शिर्के कंपनी बांधणार महापालिका सफाई कामगारांची घरे)

इथेही लावली अधिक बोली

तर हीच कंपनी गट क्रमांक दोनमधील शहरातील बी वॉर्डमधील ६४ जेल रोड, ४२ जेल रोड, पी.जी. सोलंकी, सिध्दार्थ नगर, टँकपाखडी या पाच वसाहतींमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी पात्र ठरली आहे. याठिकाणी ७३२ सदनिका असून त्याठिकाणी ३०० चौरस फुटांच्या ११५२ आणि ६०० फुटांच्या १०५ सदनिका प्रस्तावित केल्या होत्या. परंतु या कंपनीने या निविदेमध्ये बोली लावताना ३०० चौरस फुटांच्या १८८६ आणि ६०० चौरस फुटांच्या १४४ सदनिका देण्याचे मान्य केले आहे. या सर्वांच्या बांधकामासाठी महापालिकेने २१३.६६ कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु कंत्राटदाराने महापालिकेच्या अंदाजापेक्षा साडेतीन ते चार पट अधिक दराने बोली लावत, हे काम ५९४.११ कोटी आणि विविध करांसह हे काम ७८३.५२ कोटी रुपयांना मिळवण्याचा प्रयत्न केला.

वरिष्ठ पातळीवरुन हस्तक्षेप

विशेष म्हणजे महापालिकेने प्रति चौरस मीटरसाठी ४६ हजार ८८७ कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त करुन, निविदा मागवली होती. परंतु कंत्राटदाराने हे बांधकाम ५२ हजार ४५५ चौरस मीटर दराने करण्याची बोली लावत हे काम मिळवले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या गट क्रमांक २ व ३ साठी एकमेव कंत्राट कंपनीने निविदा भरली आणि त्या एकमेव कंपनीला महापालिका प्रशासनाने काम देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील काही महिन्यांपासून ठाण्यातील एक मोठे बांधकाम व्यावसायिक हे महापालिकेच्या कंत्राट कामांमध्ये विशेष लक्ष घालत असल्याची चर्चा होती. तसेच मुंबई महापालिकेतील कामकाजात ठाण्यातील राज्य मंत्रिमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या नेत्याने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेत काम करणाऱ्या या कंपनीला तसेच एकमेव कंपनी असतानाही काम दिल्यामुळे यामध्ये वरिष्ठ पातळीवरुन मोठा हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

(हेही वाचाः नवी मुंबईतील विमानतळालाही शिवरायांचेच नाव दिले जावे! राज ठाकरेंची भूमिका )

गट क्रमांक ३

गौतम नगर टप्पा २ (३०० चौ.फूट : ६९० सदनिका, ६०० चौ. फुट : १७३ सदनिका )

शीव सरदार नगर इमा.ए१/ए२(३०० चौ.फूट : ११४ सदनिका,)

कल्पक प्लॉट(३०० चौ.फूट : १६७ सदनिका,)

शीव कोळीवाडा रावळी कॅम्प(३०० चौ.फूट : २०० सदनिका,)

ना.म. जोशी मार्ग(३०० चौ.फूट : ८८ सदनिका,)

माहिम प्लॉट (३०० चौ.फूट : ४०८ सदनिका, ६०० चौ. फुट : १४४ सदनिका )

शिश महल (३०० चौ.फूट : ४६० सदनिका,)

३०० चौरस फुटाच्या एकूण सदनिका : २१३४

६०० चौरस फुटाच्या एकूण सदनिका : ३१७

पात्र कंत्राटदार कंपनी : शायोना कॉर्पोरेशन कंपनी

पुनर्विकासाचा कंत्राट खर्च : ७०४ कोटी आणि विविवध करांसह एकूण ९२९.२६ कोटी रुपये

यापूर्वी केलेली कामे : ठाणे महापालिका

गट क्रमांक २

जेल रोड बी वॉर्ड (३०० चौ.फूट : २३०सदनिका,)

जेल रोड बी वॉर्ड(३०० चौ.फूट :२०२ सदनिका,)

पी.जी. सोलंकी डि वॉर्ड(३०० चौ.फूट : ३४६ सदनिका, ६०० चौ. फुट : १४४ सदनिका)

सिध्दार्थ नगर, ई वॉर्ड (३०० चौ.फूट : ६७६ सदनिका,)

टँकपाखाडी ई्र वॉर्ड (३०० चौ.फूट : ४३२ सदनिका,)

३०० चौरस फुटाच्या एकूण सदनिका : १८८६

६०० चौरस फुटाच्या एकूण सदनिका : १४४

पात्र कंत्राटदार कंपनी : शायोना कॉर्पोरेशन कंपनी

पुनर्विकासाचा कंत्राट खर्च : ५९४ कोटी आणि विविध करांसह एकूण ७८३.५२ कोटी रुपये

यापूर्वी केलेली कामे : ठाणे महापालिका

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.