ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनमधील भ्रष्टाचारावर ‘परिवर्तन पॅनल’ करणार प्रहार

149

‘दि ठाणे जिल्हा को-ऑप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड’मध्ये गेल्या १५ वर्षांपासून एकाधिकारशाही सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारावर फोफावला असून, त्यावर प्रहार करण्यासाठी ‘परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती परिवर्तन पॅनलचे संयोजक अॅड. सतनाम सिंग रसगोत्रा यांनी दिली.

येत्या आठ जानेवारीला ‘दि ठाणे जिल्हा को-ऑप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड’ची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात परिवर्तन पॅनल उतरले असून, रिक्षा हे त्यांचे अधिकृत चिन्ह आहे. याविषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी संवाद साधताना सतनाम सिंग रसगोत्रा म्हणाले, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे संपूर्ण जिल्ह्यात १३ हजार सभासद आहेत. विद्यमान संचालक मंडळाच्या १५ वर्षांच्या एकाधिकारशाहीला सक्षम पर्याय म्हणून उच्चशिक्षित व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले उमेदवार घेवून आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत.

सतनाम सिंग म्हणाले, संस्थेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. संस्थेने २०१९-२० पासून पुरग्रस्त सहाय्य निधी गोळा केला. मार्च २०२२ अखेरपर्यंत २१ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. तो मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणे गरजेचे होते. मात्र संस्थेने त्याचा वापर वैयक्तिक व्यवहारात केला. संस्थेच्या सुमारे १ कोटींच्या मुदत ठेवी मार्च २०२२ अखेर अवघ्या ८ लाखांवर आल्या आहेत. तसेच आवश्यकता नसताना १५ लाखांचे कर्ज घेवून वाहन खरेदी केली आहे. त्याचा वैयक्तिक कारणासाठी वापर केला जात आहे.

मतदारांच्या भेटी घेऊन या बाबी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणित आहोत. विद्यमान समितीच्या गैरकारभारमुळे सभासदांच्या मनात प्रचंड असंतोष असून, तो या निवडणूकीच्या माध्यमातून बाहेर पडेल. ही बाब विद्यमान संचालक मंडळाच्या लक्षात आल्याने त्यांनी राजकीय बळाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण संस्था राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली जात आहे, असा आरोपही सतनाम सिंग यांनी केला.

परिवर्तन पॅनलचे अधिकृत अमेदवार

अॅड. सतनाम सिंग रसगोत्रा, गणेश लोहकरे, रघुनाथा टी. एन., समीर कोरे, अॅड. हरिष भंडारी, वसंत साबळे, अॅड. वर्षा कोळी, मकसुद खान, राजेंद्र गुप्ते, विशाल परमार, सुजित सावंत, राहुल खानविलकर, गुरूदत्त देसाई, इंजि. हबीब जाफर सय्यद, सोनीया अलके, राणी देसाई, इंजि. शैलेंद्र चिखलकर, इंजि. विलास तांबे, अनुया मिसाळ.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.