शनिवारी हनुमान चालिसाच्या पठणावरुन झालेल्या वादानंतर, राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर, भाजप आक्रमक झाले आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये रविवारी पत्रकार परिषद घेत, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माझा मनसुख हिरेन करण्याचा सरकारचा डाव होता, असे म्हणत गंभीर आरोप केला आहे. तसेच, या संदर्भात भाजपाचे एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
संजय पांडे जबाबदार
शनिवारी झालेला हल्ला हा ठाकरे सरकारने स्पाॅन्सर केला होता. मी पोहोचण्याआधी पोलीस स्टेशनला कळवले होते. तरीसुद्धा माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. शनिवारी पोलीस स्टेशनमधून निघताना जेव्हा पोलिसांना सांगितले की माझ्यावर हल्ला होणार, तेव्हा त्यांनी जबाबदारी घेतली की आम्ही व्यवस्था केली आहे आणि पोलीस स्टेशनचे दार उघडल्याबरोबर 70 ते 80 गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आणि या सर्व प्रकाराला संपूर्णपणे पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
माझ्या नावाने खोटे स्टेटमेंट लिहिण्यात आले
वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची काॅपी दाखवत किरीट सोमय्या म्हणाले की, वांद्रा पोलिसांनी बोगस एफआयआर दाखल करुन घेतली. या एफआयआरमध्ये लिहिले आहे की शिवसैनिक 100 मीटर आणि 3 किलोमीटर दूर आहेत. हे असे पोलिसांना सांगणारे संजय पांडेच असल्याचे, किरीट सोमय्या म्हणाले. माझ्या गाडीवर एकच दगड लांबून आल्याचे, माझ्या नावाने स्टेटमेंट संजय पांडे यांनी लिहिल्याचा घणाघातही किरीट सोमय्यांनी यावेळी केला.
( हेही वाचा: भाजपा आक्रमक: किरीट सोमय्या हल्लयाच्या निषेधार्थ भाजप आंदोलन करणार )
त्या पाच अधिका-यांवर कारवाई करा
माझ्यावर याआधी दोन हल्ले करण्यात आले. आता हा खार येथे झालेला तिसरा हल्ला आहे. उद्धव ठाकरे सरकारचा हा उद्धटपणा आहे. आधी वाशिम, नंतर पुणे आता खार या तीन ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला आहे. काल माझ्यासोबत असणा-या पाच पोलीस अधिका-यांवर कारवाई करा. मला खोटे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे या अधिका-यांचे निलंबन करावे. देवाची आणि मोदी सरकारची कृपा म्हणून मी शनिवारी वाचलो, असे वक्तव्य सोमय्यांनी यावेळी केले .