बोरिवली (पश्चिम) येथील आर.एम. भट्टड मार्गावर उभारण्यात आलेले उड्डाणपूल शनिवार, 18 जूनपासून जनतेकरता खुले करून देण्यात आलेले आहे. अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचा पृष्ठभाग बांधण्यात आला आहे. जेणेकरून या पुलावरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी घसरल्या जाणार नाही. या पुलाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडल्याने इतर वाहतुकीसाठी ते खुले करून देण्यात आले आहे. या लोकार्पण प्रसंगी शिवसेना आणि भाजप समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकले गेले होते. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणाबाजीतच हा कार्यक्रम पार पडला.
वाहतुकीचा वेग वाढणार
आर.एम. भट्टड मार्गावर बोरिवली (पश्चिम) मधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलापर्यंत बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे शामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या भागातील वाहतुकीला मदत होणार आहे. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन हा पूल विस्तारित झाला असल्याने वाहतुकीचा वेग तर वाढणार आहेच सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.
(हेही वाचा रवी राणा यांच्या विरोधात अटक वॉरंट! राजकीय पातळीवर तर्क वितर्काला उधाण)
४ हजार १८६ स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आले
सुमारे ९३७ मीटर लांब अंतराच्या या उड्डाणपुलावर पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार मार्गिका आहेत. कंपोसिट सेक्शन तंत्रज्ञान वापरून व एक स्तंभ पद्धतीने बांधलेल्या या उड्डाणपुलावर अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची काळजी घेतली गेली आहे. सदर उड्डाणपुलासाठी १३ हजार ३४७ घन मीटर काँक्रिट, २ हजार ९०० मेट्रिक टन रिइन्फोर्समेंट स्टील, तर ४ हजार १८६ स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे १७३ कोटी रुपये खर्च झाला आहे. या लोकार्पणप्रसंगी माजी आमदार तथा म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषा चौधरी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, आर / मध्य विभागाचे सहायक आयुक्त जावेद वकार आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community