एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरले जात नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र एसटी आणि बेस्ट बसने ग्राह्य धरण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुतिया यांना दूरध्वनीवरुन दिले.
परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना ५० टक्के सवलत देण्यात येते. त्या सवलतीची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांगांना योग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करावे. तसेच वसतीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी
ग्रामीण भागात ज्या दिव्यांगांच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल तिथे शौचालय बांधण्यासाठी ग्रामविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्तावावर मुख्य सचिवांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Join Our WhatsApp Community