सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. दरम्यान राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने सोमवारी, १५ मेला ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष १७ आणि १८ मेला महाराष्ट्र दौऱ्यावर)
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलेसे केले. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community