गोंदियातील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार – मुनगंटीवार

125

गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित व नगर परिषदेकडून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या १५ ऑगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी युद्ध स्तरावर काम करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

( हेही वाचा : दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावरील खेळाच्या मैदानाचे आरक्षण झाले रद्द? )

या संदर्भात सह्याद्री अतिथी गृहावर सोमवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, गोंदिया नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार चव्हाण, सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव विद्या वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

“झाडीपट्टी आणि हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून गोंदिया येथे अद्ययावत आणि सुसज्ज नाट्यगृह व्हावे आणि ते कलावंतांना परवडेल अश्या दरात उपलब्ध करुन द्यावे असेही निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. या सभागृहासाठी सौर ऊर्जेचा अधिक वापर व्हावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

२३.५३ कोटींच्या नवीन प्रस्तावाला मान्यता

हे नाट्यगृह बांधण्यासाठी वाढीव अंदाजित खर्चाबाबत बैठकीत चर्चा झाली आणि २३.५३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मान्यता देऊन ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित मान्यता प्रदान करण्याच्या सूचना उपसचिवांना दिल्या. निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून नगर परिषदेने हे काम तातडीने करुन घ्यावे असे निर्देश दिले. या सोबतच या सभागृहाच्या इमारतीत असलेल्या ३४ गळ्यांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.