…तर कोरोनाग्रस्तांना सोबत घेऊन मातोश्रीवर मोर्चा काढू… सदाभाऊंचा इशारा!

78

रेमडेसिवीर औषध कंपन्यांची राज्य सरकारने मुस्कटदाबी केल्याने महाराष्ट्रात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा निर्णय घेऊन पुरवठा सुरळीत केला नाही तर, मंगळवार २० एप्रिल रोजी कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मोर्चा काढणार असल्याचा इशारा, माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

काय म्हणाले सदाभाऊ?

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले, एका बाजूला राज्यात  रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांचे बळी जात आहेत. दुसऱ्या बाजूला अन्न व औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी, रेमडेसिवीर खरेदीत केवळ कमीशन खायचे असल्याने खरेदी थांबवली आहे. कंपन्यांनी इंजेक्शन केवळ राज्य सरकारलाच विकायचे, असा फतवा सरकारने काढला आहे. त्यामुळे कंपन्यांना ते इंजेक्शन मेडीकल दुकानदारांना थेट विकता येत नाही व परिणामी सर्वसामान्य नागरिकांना देखील मिळू शकत नाही. ही बाब अतिशय संतापजनक असून, सरकारने स्वतः तात्काळ इंजेक्शन खरेदी करावीत व खाजगी मेडीकल दुकानदारांनाही विकण्याची मुभा कंपन्यांना द्यावी. जेणेकरुन रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, सरकार केवळ कमीशन आणि खंडणीसाठी सर्वसामान्य जनतेचे जीव घेणार असेल तर, रयत क्रांती संघटना अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे पुतळे तर जाळणारच आहे. त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर कोरोनाग्रस्त व नातेवाईकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.