घड्याळाचा अलार्म करून दिली सुषमा अंधारेंना शिवसेना प्रवेशाची जाग

187

आंबेडकर चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना प्रवेश केला. परंतु आंबेडकर चळवळीतील या महिला नेत्याच्या शिवसेना प्रवेशानंतर त्यांना पक्षाचे उपनेते बनवण्यात आले. पण यापूर्वी शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यांचे पुत्रे आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टिका करणाऱ्या अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामागे घड्याळाचा अलार्मच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. घड्याळयाच्या अलार्मने अंधारे यांनी शिवसेना प्रवेश करण्याची जाग करून दिली आहे.

(  हेही वाचा : वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण! म्हणाले… )

शिवसेना उपनेत्या बनवत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली

शिवसेना पक्षात फूट पडत आता शिवसेनेचे दोन गट पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक अशाप्रकारे दोन गट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून दोन्ही गटांमध्ये दावेदारी सुरु आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आणि चिन्ह कुणाचे यावरून वाद असतानाच फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तथा प्रसिध्द वक्त्या सुषमा अंधारे यांनी शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेश केल्यानंतर अंधारे यांची शिवसेना उपनेत्या बनवत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या पक्ष प्रवेशाच्या वेळी अंधारे यांनी, आपल्या सर्वांचा एकच संवैधानिक शत्रू असेल, तर उध्दव ठाकरेंचे नेतृत्व मान्य आहे,असे सांगितले.

सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता. राष्ट्रवादीचा प्रचार करताना त्यांनी शिवसेना व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांचा समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश न करता त्या पक्षासाठी प्रचार करताना शिवसेना आणि ठाकरेंवर टीक करणाऱ्या अंधारेंना आताच शिवसेना का आठवली असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेत उभी फुट पडून खरी शिवसेना कुणाची यावरून कायदेशीर लढाई सुरु असतानाच अंधारे यांना शिवसेनेत प्रवेश करावा असे का वाटले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पवारांनी अंधारेंना शिवसेनेचे मार्ग दाखवल्याची जोरदार चर्चा

अंधारे यांच्यासारख्या आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांची खरी गरज राष्ट्रवादी काँग्रेसला असताना त्या पक्षात प्रवेश न करता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे घड्याचा अलार्मच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या या पडत्या काळात खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणे धडधडती तोफ आणि भाजपवर टीका करणाऱ्या डॅशिंग कार्यकर्त्यांची शिवसेनेला गरज होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधारे यांना शिवसेनेत पाठवण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे. पवारांनी अंधारेंना घड्याळाच्या अलार्मने त्यांना शिवसेना पक्षप्रवेशाची जाग करून दिल्याचे बोलले जात असून भविष्यात संजय राऊत यांच्याप्रमाणे अंधारे यांच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका करण्याची रणनिती पवारांनी शिवसेनेच्या माध्यमातून आखली असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती असल्याने त्यांना राजकीय टिपण्णी करता येत नाही. परंतु शिवसेनेच्या उपनेत्या मिना कांबळी, विशाखा राऊत यांच्याकडूनही कधी राजकीय हल्ला चढवला जात नाही. दिपाली सय्यद यांच्याकडून अपेक्षा असल्या तरी त्याही तेवढ्या आक्रमक होत नसून मनिषा कायंदे याही म्हणाव्या तशा टीका करताना दिसत नाही. त्यामुळे अंधारे यांना पुढे करून त्यांच्यावर टीका करण्यासाठीच पवारांनी अंधारेंना शिवसेनेचे मार्ग दाखवल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.