- खास प्रतिनिधी
भाजपाकडून (BJP) विधानसभा उमेदवार निवडीसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘लिफाफाबंद’ पद्धतीवर भाजपाच्याच कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा विश्वास नसून काहींनी समाजमाध्यमांमध्ये याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.
कशी आहे निवड प्रक्रिया?
भाजपाच्या (BJP) वाट्याला आलेल्या १६० मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक निरीक्षक नेमला जाईल आणि संपर्कप्रमुखांकडे दिलेले लिफाफे मतदारसंघातील प्रमुख ८० ते १०० स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हाती देण्यात येतील. त्यात प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्यांसह प्रदेश मोर्चांचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, मोर्चा मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस, मंडळांच्या सेलचे संयोजक, जिल्हा परिषद, पंचायत समिति, नगरपरिषद सदस्य, आजी-माजी आमदार-खासदार, तालुका सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांनी भाजपाचा आमदार म्हणून त्यांना कोण हवा आहे आणि त्यांचा पसंतीक्रम चिठ्ठीवर लिहावा आणि लिफाफ्यात टाकावा. त्यानंतर हे लिफाफे चार पदाधिकाऱ्यांसमोर सीलबंद करून मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात जमा केले जातील आणि भाजपाचे (BJP) राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उघडतील त्यानंतर त्यांच्या मुलाखती आणि पुढे त्यातून अंतिम उमेदवारांची निवड केली जाईल, अशी ही प्रक्रिया आहे.
(हेही वाचा – इराणच्या अणुकेंद्रावर हल्ले करावेत; Donald Trump यांचा इस्रायलला सल्ला)
मुलाखतीचा फार्स कशाला?
या प्रक्रियेवर भाजपाच्या (BJP) एका पदाधिकाऱ्याने एका व्हॉटस्अॅप ग्रुपवर टाकलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. “सर्वसाधारणपणे मंडलातील पदाधिकारी आमदारच ठरवतात. त्यामुळे कोणाला जास्त मते मिळणार हे जगजाहीर आहे. दुसरी गोष्ट अशी की, ३ नावे कोण ठरवणार? नवीन माहितीनुसार इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात होणार आहे. मग फक्त ३ जणांच्या नावाची चाचपणी असेल तर मुलाखतीचा फार्स कशाला?”
लोकशाहीला अभिप्रेत व्यवस्था नाही
ते पुढे म्हणतात, “२०१९ ला घाटकोपर पूर्व मतदार संघात इच्छुकाच्या मुलाखती घेतल्या व त्यातील एकालाही तिकीट न देता ज्याने मुलाखतही दिली नाही, त्याला तिकीट दिले. वानगीदाखल हे उदाहरण दिले. अशी अनेक उदाहरणे आहेत. पक्षात उमेदवारी देण्याची कोणतीही लोकशाहीला अभिप्रेत असलेली व स्पष्ट व्यवस्था नाही ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे व मान्य केली पाहिजे. श्रेष्ठींनी ज्यांना पाहिजे त्यांना तिकिटे द्यावीत पण खोटे नाटक बंद करावे.”
(हेही वाचा – Gold Price : सोनं ८०,००० तर चांदी १ लाखांच्या वर जाण्याच्या वाटेवर)
भगव्यावर प्रेम म्हणून शांत
पक्षात स्पष्ट बोलणाऱ्यांचे ऐकून घेतले जात नाही अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. “पक्षात आपले मत मांडण्यासाठी आज व्यवस्था नाही. नेत्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांशी बोलायला वेळ नाही म्हणून SM चा आधार घेवून व्यक्त होतोय. माझ्यासारखे अनेक जण आज गप्प गप्प आहेत व फक्त भगव्या ध्वजावर प्रेम म्हणून शांत बसले आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.
ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया असून अशाच प्रतिक्रिया अन्य पदाधिकाऱ्यांकडूनही व्यक्त होत आहेत मात्र समविचारी गटात, इतकांच फरक आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community