महापालिकेत महापौर नाहीत, पण ओएसडीची नियुक्ती!

127

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आली असून, सध्या महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकाच अस्तित्वात नसल्याने महापौर, गटनेतेही नाहीत. मात्र, महापौर नसताना त्यांच्या कार्यालयाचे कामकाज पाहण्यासाठी विद्यमान विशेष कार्य अधिकारी(ओएसडी) देवेंद्रकुमार जैन यांना आणखी ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिका ७ मार्च रोजी बरखास्त होण्यापूर्वी आयुक्तांनी २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जैन यांना मुदतवाढ देऊन त्यांचे पुन्हा एकदा पुनर्वसन केले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या जैन यांच्यावर उपआयुक्त (अतिक्रमण निर्मुलन) या कार्यालयासह राजे शहाजी क्रिडा संकुल व कालिदास नाट्यगृह यांचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापौरच नसताना, अशा प्रकारच्या ओएसडीची खरोखरच गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कंत्राट कालावधीत कामकाज पाहणार

महापालिकेचे माजी उपायुक्त देवेंद्र कुमार जैन यांची महानगरपालिका आयुक्त यांच्या २८ फेब्रुवारी २०२२ मंजूरी दिनांकापासून अथवा ते पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून पुढील ११ महिन्यांकरिता  “विशेष कार्य अधिकारी” म्हणून नियुक्तीचे कार्यालयीन आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये दैवेंद्र जैन हे “विशेष कार्य अधिकारी” उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) कार्यालयासह शहाजी राजे भोसले अंधेरी क्रीडा संकुल, अंधेरी (प.), कालिदास नाट्यगृह मुलुंड (प.) व महापौर कार्यालयाचे कामकाज इत्यादी सर्व प्रकारचे कामकाज ११ महिन्यांच्या कंत्राट कालावधीत पाहतील,असे नमूद केले आहे. शहाजी राजे भोसले क्रिडा संकुल अंधेरी (प) व कालिदास नाट्यगृह मुलुंड येथील “विशेष कार्य अधिकारी’ म्हणून कामे करण्यासाठी विहित अटी व शर्तीबाबत उपायुक्त (आपत्कालिन व्यवस्थापन) यांच्या कार्यालयामार्फत परस्पर कळवण्यात येईल,असेही म्हटले आहे.

महापौर नसताना कोणाला देणार सल्ला

विशेष म्हणजे जैन यांची मागील वर्षी ओएसडी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. महापौरांचे सल्लागार म्हणून यापूर्वी माजी उपायुक्त डॉ. किशोर क्षिरसागर यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर, या जागी जैन यांची वर्णी लावून त्यांना बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानचे व्यवस्थापक अशीही जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासाठी महापालिका मुख्यालयातील जुन्या व विस्तारीत इमारतीमधील जागेत कार्यालय उपलब्ध करून दिले होते, परंतु वर्षभरात जैन यांनी याचा कधीही वापर केला नाही. जैन यांचे महापौर कार्यालयाच्या कामकाजात कोणताही सहभाग वर्षभरात नोंदवला गेलेला नाही,असेच बोलले जात आहे. तसेच आता महापालिकेत प्रशासक नेमला गेल्याने महापौरच नसताना, जैन हे कोणत्या कामकाजात भाग घेणार आणि कोणाला सल्ला देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा: 30- 31 मार्चला उकाडा वाढणार! हवामान विभागाने केले ‘हे’ आवाहन! )

प्रशासनाच्या विरोधात जाणार?

याशिवाय महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाला यापूर्वी उपायुक्त नसल्याने, त्यांच्यावर ओएसडीची जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु आता या विभागाच्या उपायुक्तपदी चंदा जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे ओएसडी म्हणून ते काय काम करणार आहे,असाही प्रश्न उपस्थित आहे. मात्र,महापौरच नसताना त्यांच्यासाठी सल्लागार तथा ओएसडी नेमणूकीचे काढलेले आदेश प्रशासनाच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

( हेही वाचा: महाविकास आघाडीला घरचा आहेर! )

अनेक जबाबदा-या सांभाळल्या

मुंबई महापालिकेचे उपायुक्त म्हणून सेवा निवृत्त झालेल्या देंवेंद्र जैन यांनी निवृत्तीपूर्वी जी-उत्तर विभाग, पी-उत्तर विभाग तसेच जी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी संभाळली होती. त्यानंतर उपायुक्त बनल्यानंतर त्यांनी अतिक्रमण निर्मुलन विभागाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच कोविडच्या काळात गोरेगाव नेस्को येथील जंबो कोविडच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. तत्कालिन महापालिका आयुक्त प्रविण सिंह परदेशी यांनी या कोविड सेंटरच्या उभारणीची जबाबदारी जैन यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर जैन यांच्यावर विमानतळावर प्रवाशांची तसेच त्यांना करण्यात येणाऱ्या क्वारंटाईन आदींची सुविधा पुरवण्यासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.