इंडिया आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या डीएमकेची सत्ता असलेल्या तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमकेचे नेते एस.एस. शिवशंकर यांनी श्रीरामांबाबत (Shri Ram) एक वादग्रस्त विधान केले आहे. भगवान श्रीरामांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आहे, असा दावा शिवशंकर यांनी केला आहे.
अरियालूर जिल्ह्यातील गंगईकोंडाचोलपूरम येछे राजेंद्र चोल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना डीएमकेचे मंत्री शिवशंकर म्हणाले की, आम्ही चोल वंशाचे सम्राट राजेंद्र चोल यांचा जन्मदिवस साजरा करतो. आमच्याकडे शिलालेख, त्यांनी बांधलेली मंदिरं आणि त्यांनी बांधलेले तलाव यासारखे काही पुरातत्विय पुरावे आहेत. मात्र भगवान श्रीरामाच्या (Shri Ram) इतिहासाचा शोध घेण्यासाठी कुठलाही पुरावा नाही आहे. भगवान श्रीराम हे ३ हजार वर्षांपूर्वी होते, असा दावा करण्यात येतो. ते अवतारी पुरुष होते, असे सांगण्यात येते. मात्र अवतार जन्माला येऊ शकत नाही. जर राम अवतार होते, तर त्यांचा जन्म होऊ शकत नाही. तसेच जर त्यांचा जन्म झाला असेल तर ते देव असू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
शिवशंकर यांनी यावेळी रामायण आणि महाभारतावर टीका केली. रामायण आणि महाभारतामध्ये लोकांना शिकण्यासारखा कुठला धडा नाही आहे. मात्र तामिळ कवी तिरुवल्लूर यांनी दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या दोह्यांच्या संग्रहामध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे. दरम्यान, शिवशंकर यांनी केलेल्या विधानांवर भाजपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Join Our WhatsApp Community