मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर महिला पोलिस अधिका-याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने थेट पोलिसांनाच चपराक लगावली आहे. हे प्रकरण काल्पनिक असून कुठल्याही तथ्यांवर आधारलेले नाही, असा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेचे एका पेक्षा एक ‘टीझर’, फक्त एका क्लिकवर)
न्यायालयाचा निर्णय
या दोघांवरही करण्यात आलेले आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळून आले नाही. आरोपींच्या कोठडीसाठी कोणतंही ठोस कारण नसल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करता येणार नाही. तपास अधिका-यांच्या कल्पनाशक्तीच्या आधारे केस बनू शकत नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा जाणीवपूर्वक कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असंही सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
ही सरकारला चपराक- देशपांडे
खरंतर ही पोलिसांपेक्षा राज्य सरकारला चपराक आहे. कारण पोलिस दबावाखाली काम करत होते. त्यामुळे आमच्यावर चुकीची कलमे लावण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सरकारच्या कारभारावर टीका केल्यामुळे जर अशाप्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जाणार असतील, तर आमचा न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा धक्का कुणालाही लागला नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो. तोच निर्णय आता न्यायालयाने दिला आहे.
(हेही वाचाः नवाब मलिकांना वाचवण्यापेक्षा अर्धी धडपड…, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community