Assembly Election : गर्दी टाळण्यासाठी मुंबईमध्ये असणार १० हजार १११ मतदान केंद्रे

41
Assembly Election : गर्दी टाळण्यासाठी मुंबईमध्ये असणार १० हजार १११ मतदान केंद्रे
  • प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदान केंद्रांवर संथ गतीने झालेले मतदान आणि मतदान केंद्राबाहेर उशीरापर्यंत लागलेल्या मतदारांच्या रांगा यावरून टीकेचे लक्ष्य झालेल्या लोकसभा निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २१८ ने वाढवली आहे. त्यामुळे मुंबईतील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ वर पोहचली असून एका मतदान केंद्रावर सरासरी १ हजार २०० मतदार असणार आहेत. याआधी मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १ हजार ५०० मतदार होते. आता मतदारांची संख्या कमी केल्याने मतदानाचा वेग वाढून मतदारांचा खोळंबा टळणार आहे.

मुंबईत मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संथ गतीने मतदान होत असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टीका केली होती. मतदानाची कासवगती आणि मतदान केंद्राबाहेर लागलेल्या मतदारांच्या रांगा यामुळे अनेक मतदारांनी मतदान करण्याचे टाळले होते. यावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मुंबईतील मतदान केंद्रांबाबत सुसूत्रता आणली आहे. यामुळे मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोगाला वाटतो.

(हेही वाचा – Disabled Voters : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग मतदारांसाठी हेल्पलाईन सुरु)

भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू आहे. या तयारीनुसार मुंबईतील एका मतदान केंद्रावर सरासरी १ हजार २०० पर्यंत मतदारसंख्या राहील, हे सूत्र लक्षात ठेवून मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर अधिक मतदान केंद्र असणाऱ्या एकाच ठिकाणावरील मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुंबईतील काही भागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये झालेल्या सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत महापालिका मुख्यालयात परवा, गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत मतदान केंद्र सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी, मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली. लोकसभा निवडणुकीवेळी मुंबई शहर जिल्ह्यात एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र होते. तर, मुंबई उपनगर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार ३८४ होती. सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे २ हजार ५३७ आणि ७ हजार ५७४ म्हणजेच संपूर्ण मुंबईत १० हजार १११ इतकी झाली आहे.

(हेही वाचा – Islam स्वीकार, हिंदू धर्म चांगला नाही; १०वीच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर इझहरला अटक)

सुसूत्रीकरण केल्याने मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही माहिती देण्यात येईल, असेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.