पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार अवघ्या काही तासांत होणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मोदींच्या या नव्या मंत्रीमंडळात 24 नव्या नेत्यांना मंत्रीपदाची खुर्ची मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे असू शकतात संभाव्य 24 मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनेवाल, पशुपती नाथ पारस, नारायण राणे, भूपेंद्र यादव, अनुप्रिया पटेल, कपिल पाटील, मिनाक्षी लेखी, राहुल कस्वां, अश्विनी वैष्णव, शंतनू ठाकूर, विनोद सोनकर, पंकज चौधरी, आरसीपी सिंह, दिलेश्वर कामत, चंद्रेश्वर प्रसाद, रामनाथ ठाकूर, राजकुमार रंजन, बी एल वर्मा, हिना गावीत, अजय मिश्रा, शोभा करंदलाजे, अजय भट्ट, प्रीतम मुंडे
या नेत्यांची नावे संभाव्य केंद्रीय मंत्र्यांच्या यादीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी केंद्रात मंत्र्यांच्या राजीनाम्यांना सुरुवात! यांनी दिले राजीनामे)
महाराष्ट्रातून यांची नावे चर्चेत
महाराष्ट्रातून कोणत्या नेत्यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार, याची उत्सुकता सबंध महाराष्ट्राला लागून राहिली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण यांचे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नारायण राणे यांचे मोदींच्या मंत्रिमंडळातील स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे. राज्यसभेचे खासदार असलेल्या नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय अवजड उद्योग खाते दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, हिना गावीत यांचीही नावे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
दानवे-धोत्रेंचा पत्ता कट
मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, थावरचंद गहलोत, सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, सदानंद गौडा, केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक पोखरियाल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांची मात्र केंद्रीय मंत्रीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.
(हेही वाचाः उत्तर भारतीयांची ‘कृपा’ भाजपवर होणार का?)
Join Our WhatsApp Community