महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर, तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखांवरून एक कोटी रूपये करण्याचा निर्णय बुधवारी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला. अशा चित्रपटांसंदर्भात लवकरच नवीन धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महान व्यक्तींवरील दूरचित्रवाणी मालिकांनाही अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
( हेही वाचा : भांडुपमध्ये मल्टीस्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय; प्रस्ताव मार्चमध्ये मंजूर, भूमिपूजन जानेवारीत )
या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर ज्ञान आणि प्रबोधनाचे कामही करत असतो. त्यामुळेच ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या आणि ज्यांनी समाज घडविण्यास मोलाचा हातभार लावला, अशा महान व्यक्तींवर चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका निर्मितीसाठी, तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांसाठी सहायक अनुदान देण्यात येणार आहे. समाजाला सुसंस्कारित करणे ही काळाची गरज असून सांस्कृतिक कार्य विभाग यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीची फेररचना होणार
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना येणाऱ्या वर्षात आशयघन चित्रपट आणि मालिका निर्मिती करण्यात येईल. आजच्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल. या योजनेतून निर्माण झालेल्या मालिकांना आणि चित्रपटांना उत्तम व्यावसायिक यश बॉक्सऑफिसवर मिळाले पाहिजे. त्याकरता या चित्रपटांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहावा यासाठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील नावाजलेल्या तज्ज्ञांसोबत सांस्कृतिक विभागाने काम करावे असे निर्देशही मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
येत्या १५ दिवसांत सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनुदानाच्या विषयातील तपशील ठरविणे, धोरण विषयक सूचना घेणे वगैरे विषयांसाठी चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यासाठी समितीची फेररचना करण्यात येणार आहे. या समितीला कालबद्ध पद्धतीने अहवाल देण्यास सांगण्यात येणार आहे.