राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पायलट यांचे नाव हवेतच, ‘या’ नावाची होत आहे चर्चा

सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव चर्चेत आहे. पण यामुळे गहलोत यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार असल्यामुळे आता राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

या शर्यतीत सचिन पायलट यांचे नाव आघाडीवर असताना आता याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. पायलट यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदासाठी इतर नेत्याचा विचार केला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. याबाबत जयपूर येथे रविवारी होणा-या बैठकीत निर्णय होणार आहे.

पायलट यांच्यावर नाराजी

जयपूर येथे होणा-या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीपूर्वी राजस्थानला नवे मुख्यमंत्री मिळणार आहेत. या पदासाठी सचिन पायलट यांचे नाव समोर येत असतानाच गहलोत हे पायलट यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सचिन पायलट यांच्या नावावर एकमत होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आता सीपी जोशी यांचे नाव समोर येत आहे.

या नावांची चर्चा

राजस्थान विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष सी पी जोशी यांचा मुख्यमंत्रीपदासाठी तर राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद दोतासरा यांचा उपमुख्यमंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. तर सचिन पायलट यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here