राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम, दिनांक ९ जून २०२३ रोजी, (केडगाव) अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, पावसाच्या शक्यतेमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात होणार ‘हे’ महत्वाचे करार)
अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. यावर सरकारने मदत करा अशा फक्त स्टँडींग ऑर्डर दिल्या आहेत. परंतु मदत होत नाहीय किंवा शेतकऱ्यांना मदत मिळालेली पहायला मिळाली नाही. सरकारने एक हजार ८० कोटी रुपये कारखान्यांना मंजूर केले होते. परंतु त्यातून कॅबिनेटने फक्त पाच कारखान्यांना साडे पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, रावसाहेब दानवे यांचा संबंधित कारखाना, हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित कारखान्यांना ही मदत जाहीर केली आहे. बाकीच्या कारखान्यांना मात्र राजकीय नजरेने बघून चालत नसते परंतु हे सरकार ‘हम करेसो कायदा’ यापध्दतीने काम करत आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.
‘मविआ’तील तिन्ही पक्षांकडून ४८ जागांची चाचपणी
महाविकास आघाडीमध्ये असणारे तिन्ही पक्ष ४८ जागांची चाचपणी करत आहेत. चाचपणी करण्याचा अधिकार आहे असेही अजित पवार म्हणाले. लवकरच पुणे आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणूका जाहीर होण्याअगोदर जागा कुणी लढवायच्या यावर चर्चा होईल. चंद्रपूर तर कॉंग्रेसची आहे आणि पुणे जागेबद्दल कॉंग्रेसचे वेगळे मत आहे, आमचेही वेगळे मत आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू असेही पवार यांनी सांगितले.
सरकार जाहिरातबाज
सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्याप्रमाणावर होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे असा थेट आरोप अजित पवार यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community