राड्यानंतर राजकारण जोरात, पण शिवसेनेचे ‘ते’ नेते कुठे दिसेनात

राणेंना नेहमी अंगावर घेणारे ते बाळासाहेबांचे शिवसैनिक कोण आहेत, ते पाहू...

128

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामधील संघर्ष काही मिटण्याचे नाव घेत नाही. युवा सेनेने राणेंच्या बंगल्याबाहेर केलेल्या राड्यामुळे राणे चांगलेच संतापले असून, नितेश राणे यांनी तर ‘करारा जवाब मिलेगा’, असं म्हणत येणाऱ्या काळात वणवा पेट घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र एकीकडे शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद इतका चिघळलेला असताना राणेंना थेट अंगावर घेणारे ‘ते’ शिवसैनिक मात्र कुठे दिसेनासे झाले आहेत. राणेंना नेहमी अंगावर घेणारे ते बाळासाहेबांचे शिवसैनिक कोण आहेत, ते पाहू…

(हेही पहाः ऐका ‘सत्ता-नारायणा’ची कथा…)

रामदास कदम 

बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक असे रामदास कदम यांना म्हटले जाते. गेली अनेक वर्षे राणेंशी दोन हात करणारे रामदास भाई इतका राडा होऊनही शांत बसले आहेत. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सातत्याने राणेंवर टीका करणारे रामदास भाई इतकं सर्व रामायण घडूनही काहीचं बोलताना दिसत नाहीत. उलट विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत आलेले भास्कर जाधवच राणेंवर टीका करताना दिसत आहेत.

(हेही वाचाः आता राणे राऊतांची ‘ती’ क्लिप व्हायरल करणार)

रवींद्र वायकर

शिवसेनेतील हे महत्वाचे नाव. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र मंत्रीपद न मिळाल्याने ते देखील स्वतःचा मतदारसंघ सोडून काही करताना दिसत नाहीत. त्यातच राज्यात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात संघर्ष पेटलेला असतानाही वायकर यांची काही प्रतिक्रिया पहायला मिळाली नाही. एवढेच नाही तर त्यांच्या मतदारसंघातही तसे पडसाद काही उमटले नाहीत.

दीपक केसरकर

तळ कोकणात नारायण राणे यांच्याशी वैर घेत 2014च्या निवडणुकीत शिवसेनेत दाखल झालेले दीपक केसरकर हे देखील राज्यात इतका वाद चालू असताना शांत आहेत. नेहमीच राणेंशी पंगा घेणारे दीपक केसरकर देखील या प्रकरणात काहीच बोलले नाहीत.

(हेही वाचाः राणेंच्या वादात अमित शहांची एन्ट्री : सेनेच्या अडचणीत वाढ)

अरविंद सावंत

राणेंवर सातत्याने टीका करणाऱ्यांपैकीच शिवसेना खासदार अरविंद सावंत हे एक आहेत. राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाले तेव्हा देखील अरविंद सावंत यांनी राणेंवर टीका केली होती. मात्र, सध्या ते देखील फारसे बोलताना दिसत नाहीत. युवा सेना आक्रमक झाल्यानेच शिवसेनेचे हे सच्चे सैनिक शांत झालेत का?, असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.

प्रताप सरनाईक

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिच्याशी दोन हात करत पक्षाची बाजू मांडणारे प्रताप सरनाईक देखील राणेंच्या वादावर शांत आहेत. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करुनही प्रताप सरनाईक मात्र शांत असल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचाः कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याची विकृती थांबवा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.