गंगेत हजारो प्रेते वाहून आली, त्यावर सरसंघचालकांनी बोलावे! संजय राऊतांचे आवाहन 

विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीची फाईल काय बोफोर्स, राफेल घोटाळ्याची होती का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

75

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा भूमिकेला आजही महत्व आहे. ते अधूनमधून परखड मत मांडत असतात, पण काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेमध्ये हजारो प्रेते वाहून आली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. हा राम मंदिराइतकाच महत्वाचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे, पण मोहन भागवत यावर बोलले नाहीत, त्यांनी यावर मतप्रदर्शन करावे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. सोमवार, २४ मे रोजी उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक झाली, त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपवर उलटली सोशल मीडिया!

भाजपने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कायम सोशल मीडियाचा वापर केला आहे. सध्या जे टूलकिटचे प्रकरण चर्चेला आले आहे, तोही त्याचाच भाग आहे, परंतु जेव्हा भाजपवर ते उलटले, तेव्हा मात्र भाजपावाले ट्विटर वर दबाव आणू लागले आहेत. छापेमारी, नोटीस देत आहे, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : भाजपमधून काँग्रेसमध्ये लवकरच मेगा ‘घरवापसी’… नानांनी दिले संकेत! मोदी सरकारवरही ओढले ताशेरे)

राज्यपालांनी गतीमान व्हावे! 

मंत्रिमंडळाने एकमताने संमत केलेली विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी सापडली याचा आनंद आहे, पण जेव्हा राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करतील तेव्हा संपूर्ण राजभवनाला पेढे वाटू, असेही संजय राऊत म्हणाले. ती यादी भुताने पळवली, ती भुते त्यांच्याच आसपास वावरणारे आहेत. ती फाईल काय बोफोर्स, राफेल घोटाळ्याची होती का?, राज्याच्या मंत्रिमंडळाने एकमताने संमत केलेली ही यादी आहे, ती वर्षभरापासून रखडून ठेवली जाते, ती महाराष्ट्राच्या गतिमान सरकारच्या गतिशील कारभाराला शोभा देत नाही, कारण राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात, त्यामुळे त्यांनीही त्यांच्या कारभारात गतिमानता आणावी, असेही संजय राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.