नितीन गडकरी धमकी प्रकरण: आरोपी जयेश पुजारीचा ताबा मिळवण्यात नागपूर पोलिसांना यश

131

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोप जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचा ताबा नागपूर पोलिसांना मिळाला आहे. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यामुळे नागपूर पोलिसांचे पथक बेळगावला गेले होते, हेच पथक आता जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतले आहे.

यापूर्वी नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहात केलेल्या अचानक तपासणीत जयेश पुजारीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि सीम कार्ड जप्त केले होते. त्यानंतरपासून जयेश पुजारीला ट्रान्झिट वॉरंटवर नागपुरात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अखेर नागपूर पोलिसांना पुजारीचा ताबा मिळवण्यात यश आले असून मंगळवार त्याला नागपूरमध्ये घेऊन पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

नेमकी घटना?

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात २१ मार्चला तीन धमकीचे फोन आले होते. सकाळी १०.५५ला पहिला फोन आला होता, पण त्यामध्ये काही बोलणे झाले नव्हते. त्यानंतर ११ आणि ११.५५ वाजता पुढील दोन फोन आले, ज्यामध्ये जयेश पुजारी बोलत असल्याचे सांगत दहा कोटींची मागणी केली होती. तसेच याबद्दल पोलिसांना माहिती देऊ नये, असा इशाराही देण्यात आला होता. यासोबत त्याने संपर्क करण्यासाठी एक मोबाईल नंबर दिला होता. तो मोबाईल नंबर मंगळूरमधील एका मुलींचा होता, जी तिथे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते.

बेळगावच्या जेलमधून पुजारी करत होता धमकीचे फोन 

यापूर्वी १४ जानेवारीला नितीन गडकरींच्या नागपूरमधील याच जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा धमकीचे फोन आले होते. यावेळी त्या फोनमध्ये दाऊद असा शब्द उच्चारण्यात आला होता. खंडणीची मागणी करण्याचा आशय त्या फोनमध्ये होता. जर खंडणी दिली नाही, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारू, अशी धमकी फोनद्वारे देण्यात आली होती. याप्रकरणातील आरोपी जयेश पुजारी बेळगावच्या जेलमधून हे धमकीचे फोन करत होता. आता त्याचा ताबा नागपूर पोलिसांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुजारीच्या नावाने कोणी खोडसाळपणा करत आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

(हेही वाचा – सत्तेला लाथ मारायची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही – देवेंद्र फडणवीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.