राडा संपता संपेना… भाजप आमदाराला धमकीचा फोन

राणेंची अटक आणि जामीन ह्यानंतर आता भाजप आमदाराने देखील धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे.

149

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या व्यक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू झालेला वाद काही संपताना दिसत नाही. राणेंच्या घराबाहेर युवासेनेने घातलेला राडा, राणेंची अटक आणि जामीन ह्या सर्व घडामोडी ताज्या असतानाच, आता भाजप आमदाराने देखील धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे ट्वीट करत म्हटले आहे.

काय म्हणाले लाड?

खरंतर, मला धमक्यांचे फोन येणे हे हास्यास्पद आहे! परंतु वैचारिक पातळी सोडलेल्या लोकांकडून अजून काय अपेक्षा करू शकतो आपण? त्या अनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना याबाबत पत्र लिहून अवगत करणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचे काम आहे! असे प्रसाद लाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

(हेही वाचाः आधीच ठरला राणेंच्या अटकेचा प्लॅन? हे आहेत खरे सूत्रधार)

प्रसाद लाड यांचे ‘ते’ वक्तव्य

31 जुलै रोजी भाजपच्या दादर येथील कार्यालयाचे उद्घाटन करताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानामुळे शिवसैनिकांचे पित्त खवळले होते. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असे विधान प्रसाद लाड यांनी केल्याचे त्यावेळी माध्यमांतून दाखवण्यात आले होते. पण तो आपल्या भाषणाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्याचवेळी प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले. पम तरीही सोशल मीडियावरुन प्रसाद लाड यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत शिवसैनिकांनी टीका केली होती.

मुख्यमंत्र्यांनीही दिला होता इशारा  

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख प्रसाद लाड यांनीही लाड यांचा समाचार घेतला होता. आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. अशा अनेक थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ… थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना त्यावेळी दिला होता.

(हेही वाचाः भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागेल… राणे-भाजपविरुद्ध शिवसेनेचा जंगी ‘सामना’)

सामनातून भाजपवर वाक्बाण

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून बुधवारी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्याचप्रमाणे सामनाच्या अग्रलेखात भाजपलाही थेट इशारा देण्यात आला आहे. राज्यातील भाजप नेते राणेंना पाठींबा असल्याचे म्हणत आहेत. पण राणेंचा पूर्वेतिहास पाहता मोदी-शहांनी मात्र त्यांचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. कायद्याचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपची ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही. भाजपला या बेताल बादशाहीची मोठी किंमत मोजावी लागेल, असा आक्रमक इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.