ठाकरे गटातील तीन आमदार शिंदेंच्या गळाला?; ‘या’ नेत्याच्या कार्यक्रमात लावली हजेरी

143
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील आणखी तीन आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. या तिन्ही आमदारांनी नुकतीच शिंदे गटातील एका नेत्याच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आपल्या भावाच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. त्यांचा भाऊ शिंदे गटाच्या अंतर्गत राजकारणात सक्रिय असून, एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार राजन साळवी आणि विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी हजेरी लावली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

अमोल कीर्तिकरांमुळे प्रभू अस्वस्थ

अमोल कीर्तिकर दिंडोशी मतदारसंघात सक्रिय झाल्यामुळे सुनील प्रभू अस्वस्थ आहेत. अंतर्गत दबावातून ऐनवेळी तिकीट कापले गेल्यास कोंडी होईल, या शक्यतेमुळे ते सर्व बाजू चाचपडून पाहत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी ठाकरे गटाच्या बैठकांनाही दांडी मारल्याचे समजते.
  • राजापूरचे आमदार राजन साळवी हे कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थक आहेत. मात्र, स्वपक्षातील नेत्यांकडून या प्रकल्पाला विरोध होत असल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे रिफायनरी आणि कोकणातील विकास कामांच्या मुद्यांवरून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून असल्याची चर्चा आहे.
  • चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे यांचे प्रस्थ वाढल्याने मनीषा कायंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. बाहेरून आलेल्यांना उपनेते, प्रवक्ते अशी पदे दिली जात आहेत, ही या नाराजीची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी शिंदे गटातील नेत्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.