अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा जप्त करणार – सुधीर मुनगंटीवार

अवैध मासेमारी थांबविण्यासाठी पोलिस खात्याची मदत घेण्याच्या सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

241
अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा जप्त करणार; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा जप्त करून सरकारजमा केल्या जातील तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल अशी महत्वाची घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यासाठी सध्याच्या कायद्यात लवकरच योग्य ते बदल केले जातील, असेही त्यांनी संगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विविध मच्छिमार संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार रमेशदादा पाटील आणि भाजपा मच्छिमार सेल चे श्री चेतन पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी वर्षाकाळातील सागरी मासेमारी बंदी झुगारून काही मच्छिमार मासेमारी करीत असल्याची तक्रार उपस्थित मच्छिमार बांधवांनी प्रामुख्याने केली तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी ताबडतोब मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रशासनासाठी कडक निर्देश जारी केले. अवैध मासेमारी थांबविण्यासाठी पोलिस खात्याची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

(हेही वाचा – वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता)

यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छिमार बांधवांना भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पुराव्यानिशी पकडून देण्याचे आवाहन केले. या क्षेत्रात जर भ्रष्टाचाराच्या तक्रारी असतील तर मच्छिमार बांधवांनीच हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, शासन मच्छिमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मदतीने मच्छिमार बांधवांनी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पकडून द्यावे असे ते म्हणाले. भ्रष्टाचाराच्या पुराव्यासह सापडलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल असेही मुनगंटीवार यांनी जाहिर केले. मत्स्यव्यवसाय विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक जारी केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी उपस्थित मच्छिमार संघटनांनी पालघर ते वेंगुर्ला या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधव मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर मच्छिमार संघटनांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची दखल घेऊन सुधीर मुनगंटीवार यांनी तत्परतेने प्रशासन यंत्रणेस निर्देश जारी केल्याबद्दल उपस्थित मच्छिमार बांधवांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, राजन मेहेर, ज्योती मेहेर आदी मच्छिमार नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.