काँग्रेस वाढवण्यासाठी भाईगिरी: विरोधी पक्षनेत्यांना संसदीय कामकाजांकडे लक्ष देण्याचे निर्देश!

राजा यांना आता महापालिकेतील प्रत्येक बैठक आणि सभांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून छबी उमटवतानाच, काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षात नवचैतन्य पसरू लागले आहे. पहिल्यापासून काँग्रेसच्या जडणघडणीचा बारीक अभ्यास असलेल्या आणि तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांची जाणीव असलेल्या भाई जगताप यांनी, पक्षातील नेत्यांची जबाबदारीही निश्चित करताना अनेकांच्या खांद्यांवरील भार कमी केला. पक्षाच्या नेत्यांनी पक्ष वाढीसाठीच काम केले पाहिजे. त्यांना इतर कामांसाठी जुंपले जाऊ नये, अशा स्वरुपाची भूमिका असलेल्या भाई जगताप यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या खांद्यावरील अतिरिक्त जबाबदाऱ्या कमी केल्या आहेत. त्यांना यापुढे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून सिध्द करण्यासाठी त्यांना इतर जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राजा यांना आता महापालिकेतील प्रत्येक बैठक आणि सभांमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून छबी उमटवतानाच, काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

विरोधक म्हणून प्रतिमा उंचावण्याची गरज

मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून रवी राजा यांची निवड झाली असली तरी या पदासाठी भाजपनेही न्यायालयात लढाईला सुरुवात केली. पण या न्यायालयीन लढाईत काँग्रेसच्या बाजूने निकाल देत रवी राजा यांनाच विरोधी पक्षनेते यांच्याबाबत महापालिका सभागृहाने घेतलेल्या निर्णयावरच न्यायालयानेही शिक्कामोर्तब केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस पक्षाचा दावा निश्चितच झाला. पण मागील काही वर्षांपासून विरोधी पक्षनेते म्हणून आपली प्रतिमा त्यांना उंचावता आलेली नाही. त्यामुळे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, विरोधी पक्षनेत्यांना संसदीय कार्यप्रणालीमध्ये आपली कामगिरी अधिक उंचावण्याची गरज असल्याने त्यांच्यावरील काही असंसदीय कामांमधील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. राजा यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेत ती मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील तसेच अन्य नेत्यांवर सोपवली आहे.

(हेही वाचाः मुंबई महापालिकेच्या कफपरेडमधील “ग्रीन पार्क”ला मच्छीमारांचा तीव्र विरोध…)

नाना-भाई घडवणार का करिष्मा?

राजा यांच्यावर महापालिकेत सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणतानाच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्ष वाढीकरता कामे करण्याच्याही सूचना दिल्याची माहिती, काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक कमी निवडून यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला हाताशी धरुन प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अधिक निवडून आल्यास शिवसेनेचा पाठिंबा मजबूत होईल. याउलट काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला अडचणीत आणले जाईल, असे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बिंबवले जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनाही याची जाणीव झाल्याने त्यांनी सध्याच्या ३० नगरसेवकांच्या तुलनेत सत्तेच्या समिप पोहोचणारी संख्या असलेले नगरसेवक निवडून यावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे आता मुंबईत वेगळा करिष्मा करुन दाखवण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना मोकळे सोडून पक्षवाढीसाठी त्यांचा अधिक वापर करुन घेण्याचा मुंबई काँग्रेसने निर्णय घेतला आहे. म्हणूनच मुंबई अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांना संसदीय कामकाजाकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here