अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासंदर्भात केंद्राकडे शिफारस करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

168

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजना, विनातारण कर्ज योजना राबविली जाणार आहे. शिवाय अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली.

(हेही वाचा – जेपी नड्डांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण, म्हणाले…)

अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती महोत्सवानिमित्त चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्य माणसाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांचे साहित्य व पोवाड्यांत तत्कालीन परिस्थितीचे यथार्थ प्रतिबिंब दिसते. त्यांनी अविरतपणे वंचितांसाठी काम केलेच, परंतु मराठी भाषेची पताका सातासमुद्रापलीकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घराचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करेल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अधिकाधिक सक्षम करून या समाज घटकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. उच्च शिक्षणासाठी प्राधान्याने योजना राबविण्यात येतील, असे शिंदे यांनी सांगितले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर, सुधाकर भालेराव, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, सामाजिक कार्यकर्त्या कुसुम गोखले, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अण्णाभाऊंच्या लिखाणात वैश्विक विचारधारा – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे परिवर्तनवादी चळवळीचे अग्रदूत होते. त्यांच्या शब्दात धार होती.त्यांना सामान्य माणसाच्या वेदना माहिती होती. त्यांना शिकायची संधी मिळाली नाही तरीही त्यांनी लिहिलेले साहित्य हे २७ भाषा मध्ये प्रकाशित झाले. अनेक देशांत त्यांच्या साहित्यावर डॉक्टरेट् विद्यार्थ्यांनी मिळवली. त्यांच्या लिखाणात वैश्विक जाणीवा असलेली विचारधारा होती. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसांच्या, वंचितांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.