महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली. विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसचा पाठिंबा मिळालेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात सामना आहे. तर अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचं आव्हान आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या दोन्ही जागांवर होणार आहे. या निवडणुकीत काय निकाल लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजप-काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि काँग्रेसवर ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली होती. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला.
(हेही वाचा – जगातला एकमेव ‘गीताग्रंथ’ ज्याची साजरी केली जाते जयंती!)
कोण बाजी मारणार?
भाजपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी चमत्कार होणार असल्याची भविष्यवाणी केली. त्यामुळे आज या निवडणुकीची मतमोजणी होत असून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले.तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्के बजावला असल्याचे सांगितले जात आहे.