राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या विरोधात गुन्हे दाखल!

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिस ठाण्यांत या यात्रेच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाट लावण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थाटामाटात मुंबईतून सुरु झाली. यानिमित्ताने मुंबईत शक्तीप्रदर्शन करून भाजपने अप्रत्यक्षपणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र आता या यात्रेचे आयोजन करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केले म्हणून नारायण राणे यांच्या या जन आशीर्वाद यात्रेच्या विरोधात मुंबईत ठिकठिकाणी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशा प्रकारे राणेंच्या या यात्रेला कोरोनाची लागण लागली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हा शिवसेनेचा प्रतिशोध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने समावेश करण्यात आलेल्या ४२ मंत्र्यांना जनतेमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घ्या, सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले. त्यानुसार त्या त्या मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा आयोजित होत आहेत. त्याप्रमाणे नारायण राणे यांचीही जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रात मात्र राणेंच्या यात्रेची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण भाजपला या यात्रेच्या माध्यमातून अनेक राजकीय उद्दीष्ट्ये गाठायची आहेत. त्यातील एक महत्वाचे उद्दिष्ट्य म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक होय. सांभाव्य मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेने अप्रत्यक्षपणे महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्याकरता शिवसेनेचा विरोध धुडकावून राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेव ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली. त्यामुळे आता शिवसेना याचा प्रतिशोध म्हणून राणेंच्या या यात्रेच्या विरोधात पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्याचा सपाटा सुरु केला आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

(हेही वाचा : लसींचे दोन्ही डोस घेतले तरी तुम्ही असुरक्षित! कारण वाचून व्हाल थक्क!)

गुन्ह्यांची संख्या झाली ३६!

कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत ३६ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. १९ ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलिस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कपिल पाटलांची जन आशीर्वाद यात्राही टार्गेट  

मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह ७० ते ८० भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here