मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची खांदेपालट करण्यात आल्यानंतर, पुन्हा दुसऱ्या टप्प्यात आणखी दोन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये घाटकोपर ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांची बदली भांडुप-विक्रोळी या ‘एस’ विभागाच्या सहाय्यकपदी करण्यात आली आहे. तर गिरगांव चंदनवाडी या ‘सी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांची बदली मुलुंडच्या ‘टी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी करण्यात आली आहे. वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या ‘एच/ पूर्व’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्यावर कुर्ला ‘एल’ विभागाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दोन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करत महापालिकेला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असून, या आयुक्तांना झालंय तरी काय, असा प्रश्न आता सर्वांना पडू लागला आहे.
दुस-या टप्प्यातही बदल्या
मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदाच्या अनेक जागा रिक्त असल्याने यापूर्वी किशोर गांधी, संध्या नांदेडकर, मृदुला अंडे, विश्वास मोटे, पृथ्वीराज चौहाण, मनिष वळंजु आदी सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी आणि चक्रपाणी अल्ले यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या दोन्ही सहाय्यक आयुक्तांसह कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ, राजन प्रभू, सुरेश सागर, हरिनारायण साहू यांच्याकडे विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
एल विभागाकडे दुर्लक्ष
शुक्रवारी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार, दोन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या, तर एका सहाय्यक आयुक्तावर अतिरिक्त कारभार, तसेच तीन कार्यकारी अभियंत्यांवर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा पूर्णकालिक कार्यभार सोपवण्याचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपप्रमुख अभियंता भारत तोरणे यांच्यावर सी विभागाचा पूर्णकालिक कार्यभार सोपवण्यात आला आहे. बाजार विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश रसाळ यांच्यावर यापूर्वी अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. परंतु आता त्यांच्यावर पूर्णकालिक कार्यभार सोपवण्यात आला आहे. महेंद्र उबाळे यांच्याकडेही एम पूर्व विभागाचा पूर्णकालिक कार्यभार सोपवण्यात आला आहे. एच पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता हफीज वकार जावेद मन्सुर अली यांच्यावर बोरीवली आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाचा पूर्णकालिक कार्यभार सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्तपद अजूनही रिक्त ठेऊन, या विभागाचा अतिरिक्त कार्यभार एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एल विभागाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
बदली झालेले सहाय्यक आयुक्त
अलका ससाणे : अतिरिक्त कारभार ‘एल’ विभाग
चक्रपाणी अल्ले : सहायक आयुक्त ‘टी’ विभाग
अजितकुमार आंबी : सहायक आयुक्त ‘एस’ विभाग
हफीज वकार जावेद मन्सुर अली : सहायक आयुक्त आर मध्य विभागाच्या पूर्णकालिक कार्यभार
महेंद्र शांताराम उबाळे : सहायक आयुक्त ‘एम पूर्व’ विभाग या पदाचा पूर्णकालिक कार्यभार
प्रकाश रसाळ : सहायक आयुक्त (बाजार) या पदाचा पूर्णकालिक कार्यभार
भारत नामदेव तोरणे : सहायक आयुक्त ‘सी’ विभाग या पदाचा पूर्णकालिक कार्यभार
संजय सोनावणे : सहायक आयुक्त ‘एन’ विभाग या पदाचा पूर्णकालिक कार्यभार
Join Our WhatsApp Community