कोरोना पश्चात दिवाळी उत्साहात साजरी झाल्यानंतर आता मंत्रालयात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. या टप्प्यात मोठे प्रशासनिक फेरबदल अपेक्षित असून, त्यामुळे अधिकारी धास्तावले आहेत. परिणामी, आपल्याला कुठला विभाग मिळणार, याचा कानोसा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
मंत्रालयात महसूल, गृह, वित्त, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांपासून ते पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, अकोला आदी जिल्ह्यांच्या वरिष्ठ सनदी तसेच पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या फटाक्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मोठ्या प्रशासनिक फेरबदलांचे फटाके वाजवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.
(हेही वाचा एलॉन मस्कनी ताबा घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सुरू होणार? ट्विटरने केला खुलासा)
लवकरच मुंबई महानगरपालिकेसह २७ महानगरपालिका आणि २५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. अनेक महापालिकांमध्ये मनपा आयुक्तांचा प्रशासक पदाचा प्रभार वर्षभरापासून कायम आहे. या अधिकाऱ्यांच्या जागी नव्या नियुक्त्या केल्या जाणार असून, याच आठवड्यात आदेश जारी होण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली.
गृह विभागात मोठे फेरबदल
सर्व जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची माहिती गृह विभागाकडून संकलित केली जात असून, त्यांच्याही बदल्या होण्याची शक्यता आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा सुरू असून, येत्या दोन-तीन दिवसांत त्याबाबतचे आदेश निघतील, असा अंदाज आहे. दिवाळीपूर्वी राज्यात दोन टप्प्यांत सुमारे ६० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या टप्प्यात ही संख्या दुपटीने वाढणार आहे.