शिंदे-फडणवीस सरकारकडून एकीकडे बदल्यांचा बंपर धमाका सुरू असताना, चोवीस तासांच्या आत काही बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यातील ४३ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. मात्र, त्यातील तीन पोलीस आधीक्षकांच्या बदल्यांना शुक्रवारी स्थगित देण्यात आली. यवतवमाळ, सिंधुदुर्ग व हिंगोलीच्या अधीक्षकांनी पुढील आदेशापर्यंत पदभार सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
( हेही वाचा : मुंबईच्या सौंदर्यीकरणात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील रंगरंगोटीवर भर)
गुरुवारी सायंकाळी निघालेल्या शासन आदेशानुसार, औरंगाबादचे अपर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांची सिंधुदुर्गच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. राज्य राखीव पोलीस बलात (गट क्रमांक १२- हिंगोली) समादेशक पदी कार्यरत असलेल्या संदीपसिंह गिल यांची हिंगोलीचे अधीक्षक म्हणून, तर नाशिक पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. या तीनही आधिकाऱ्यांच्या बदल्यांना शुक्रवारी स्थगिती देण्यात आली असून, आधी तेथे असलेल्या आधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत पदभार सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शिंदे-फडणवीसांत रस्सीखेच?
महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये एकमत होत नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत रंगल्या होत्या. निवडणूक प्रचार, शहरातील, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय पोलिसांच्या हातात असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचेही बोलले जात होते. मात्र, या चर्चा फोल ठरवत तब्बल ४३ अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या.
Join Our WhatsApp Community