प्रदूषणाचे वाढते प्रमाण, इंधनाचे वाढणार दर आणि इंधनाची कमतरता लक्षात घेता जास्तीत जास्त लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढता कल लक्षात घेता भारतात ही मोहीम वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता लालपरी म्हणजेच एसटीच्या ताफ्यातही इलेक्ट्रिक बस येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसची घोषणा केली. त्यानंतर आता एसटीच्या ताफ्यात तब्बल २ हजार इलेक्ट्रिक बस येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. मुंबईत त्यांनी ती माहिती दिली.
(हेही वाचा – यंदाच्या दिवाळीत गृह स्वप्न साकार होणार, MHADA च्या ३ हजार घरांची सोडत )
२ हजार इलेक्ट्रिक गाड्या टप्प्या-टप्प्याने येणार
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या २ हजार इलेक्ट्रिक गाड्या टप्प्या-टप्प्याने येणार आहेत आणि १ हजार सीएनजी गाड्या ताफ्यात घेण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी परब यांनी दिली आहे. यासह काही गाड्या एसटीच्या मालकीच्या तर काही गाड्या भाडे तत्त्वावर असतील असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे अनिल परब यांनी असेही सांगितले की, परिवहन विभागाच्या ११५ पैकी ८६ सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत. त्यामुळे लाखो लोकांना याचा फायदा होणार असल्याचेही सांगितले. तसेच राज्यातील अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभाग काम करत आहे. तालुक्यातील अपघात होणारे ब्लॅक स्पॉट किती आहेत, त्याच्यात किती सुधारणा करण्यात आल्यात, याचा अहवाल मागविण्यात आला आहे.
भाडेवाढीबाबत लवकरच होणार निर्णय
रिक्षा, टॅक्सी भाडे वाढीबाबत सरकार विचाराधीन आहे त्यामुळे भाडेवाढीबाबत लवकरच निर्णय होईल, असेही अश्वासन त्यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी या संघटनांकडून होत आहे. मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता यावर लवकरच निर्णय होणार असल्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community