Wai मध्ये तिरंगी लढत; महायुतीतील बंडखोरीचा मकरंद पाटलांना बसणार फटका?

वाई (Wai) मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे.

104

सातारा जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदारसंघात मविआतील बंडखोरीमुळे तिथे महायुतीचे शंभूराज देसाई यांना फायदा होण्याची शक्यता आहे, ततसा वाई (Wai)  विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने त्याचा फटका महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाई विधानसभा मतदारसंघातून १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, मात्र खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणते उमेदवार आहेत रिंगणात? 

वाई (Wai) मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मविआच्या जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे. तर, महायुतीमधील सिटींग गेटिंग सूत्रानुसार ही जागा अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. या मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणा देवी पिसाळ या मविआच्या अधिकृती उमेदवाराचे आव्हान असणार आहे. विरोधकांचा उमेदवार कोण असणार हे जाहीर होत नसल्याने मकरंद पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक बनली आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत पाहायला मिळाली होती. मात्र, यावेळी मदन भोसले भाजपामध्ये आहेत.

(हेही वाचा मानखुर्दमध्ये Abu Azmi यांचा प्रचार उबाठाचे शिवसैनिक करणार)

बंडखोर उमेदवार अडचणीत आणणार? 

वाई (Wai) मतदारसंघातून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी लढण्याची तयारी केली होती. पण, जागावाटपात मतदारसंघ पक्षाकडे येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही चाचपणी केल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला. जाधव यांनी यापूर्वी सातारा लोकसभा तसेच वाई (Wai) विधानसभेचीही निवडणूक लढवली. अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे त्यांची उमेदवारी युती की आघाडीच्या उमेदवाराला मारक ठरणार, का तेच बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.