पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण; दोषींवर कठोर कारवाईची विरोधकांची मागणी

108
राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता. डहाणू येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे, पाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करावे लागत आहेत, तरी आदिवासी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीसुध्दा त्यांनी केली.
अजित पवार म्हणाले, आपण जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दोन दिवसआधी पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ता.डहाणू ) येथे ६ मार्च २०२३ रोजी पाण्यासाठी आदिवासी महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित आरोपीला कडक कारवाई करावी.
राज्याच्या राजधानी शेजारी असणाऱ्या अदिवासी बांधवांना अशा दुर्दैवी प्रसंगांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची परवड होत आहे. तसेच, राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. गुन्हा दाखल करायला सुध्दा विलंब करण्यात आला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन पिडीत आदिवासी भगिनींना न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.