‘महाप्रबोधन यात्रे’त स्त्रीचा अवमान, तृप्ती देसाई संतापल्या, वक्त्यांचे ‘प्रबोधन’ करणार!

202

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेत वक्त्यांकडून स्त्रीचा अवमान करणारी वक्तव्ये केली जात आहेत, त्यामुळे या महाप्रबोधन यात्रेचे प्रबोधन करण्यासाठी आम्हालाच जावे लागेल, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

…तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किंमत मोजावी लागेल 

शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाताना दिसत आहे. अगदी दसरा मेळाव्यापासून ते आतापर्यंत पाहिले, तर या यात्रेत महाप्रबोधन करताना जे वक्ते या व्यासपीठावर बोलत असतात, जो उल्लेख भाषणात करतात, त्यात ‘आयला’, ‘आयच्या गावात’ अशा शब्दांचा वापर करतात. त्यामुळे प्रबोधन करायला जे वक्ते नेमले आहेत, त्यांचेच प्रबोधन करण्याची वेळ आलेली आहे. त्यांचे प्रबोधन करायला आम्हाला त्यांच्याच भाषणात जाऊन प्रबोधन करावे लागेल. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, कारण ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही महाप्रबोधन यात्रा घेऊन जाता, तेव्हा भाषा चांगली वापरली गेली पाहिजे. तिथे स्त्री सन्मानाची भाषा वापरली पाहिजे. परंतु ज्या महिला किवा पुरुष वक्ते आहेत ते स्त्रियांचा अवमान करणारी भाषा वापरताना दिसत आहेत. म्हणून मला उद्धव ठाकरे यांना विनंती करायची आहे की कुठेतरी महाप्रबोधन यात्रेतील भाषणाचा दर्जा घसरतो आहे, आता जर आपण याकडे लक्ष दिले नाही, तर मात्र पुढे तुमच्या पक्षाला याची किंमत मोजावी लागेल, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

(हेही वाचा कोल्हापुरातील लव्ह जिहाद प्रकरण : मुस्लिम युवकाने हिंदू मुलीला कर्नाटकात नेले)

महाप्रबोधन यात्रेत शब्द जपून वापरावे 

सध्या महाप्रबोधन यात्रेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे संबोधित करत आहेत. ही यात्रा ग्रामीण भागात जाते, तेव्हा त्यामध्ये वक्ते जे शब्द वापरतात ते शब्द ग्रामीण भागात प्रचलित होतात. हजारो लोक त्यांचे अनुसरण करत असतात, त्यामुळे त्यांनी हे शब्द जपून वापरण्याची गरज आहे. सुषमा अंधारे चांगल्या, अभ्यासू वक्त्या आहेत. त्या महाप्रबोधन यात्रेला संबोधित करतात, महिलांचा अनादर होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तिचा सन्मान केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आधीच अडचणीत आहे, आता अशा प्रकारांमुळे त्यांचा पक्ष आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे ‘या देशाची राज्यघटना माझ्या बापाने लिहिली आहे’, असे म्हणतात मग त्यांची जबाबदारी अधिक वाढते, असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

अजून राजकारणात जाण्याचा निर्णय नाही! 

सध्याचे राजकारण अगदीच ढवळून निघाले आहे. कोण कोणत्या पक्षात जात आहे, हे माहित नाही. त्यामुळे याआधी आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे घोषित केले होते, मात्र सध्याचे वातावरण पाहता आपण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नाही, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या.

(हेही वाचा दहशतवादाचा अड्डा बनलाय पाकिस्तान, तरीही भारताच्या नावाने करतोय अपप्रचार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.