Shirur : महायुतीमध्ये शिरूर लोकसभेवरून रस्सीखेच…शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा

284
पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (पुणे) म्हाडा अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याने आढळराव यांचा शिरूर (Shirur) हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव पाटील म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित कवडे यांनी त्याबाबत जीआर काढला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर (Shirur) मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील प्रबळ दावेदार असून म्हाडाचे अध्यक्ष पद मिळाल्याने अधिक वेगाने कामे होतील, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून करता येणार आहे.
 

… तरीही माझा लोकसभा मतदारसंघावर दावा – शिवाजीराव आढळराव पाटील

या नियुक्तीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, घरनिर्मितीचा लाभ मिळवून देणे तसेच जास्तीत जास्त लोकांना म्हाडाचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य सरकारने जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करतो, परंतु शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघ हा माझा जुना मतदार संघ असून त्यावर माझा अधिकार असल्याने या ठिकाणी मीच लढणार असल्याचा दावा देखील त्यांनी बोलून दाखवला.

मतदार संघात पवार कुटुंबीयांचे दौरे वाढले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत करणारच असे आव्हान दिल्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे सध्या वाढू लागले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. खेळ पैठणीचा ही खेळला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणा ही घेतला. पार्थ पवार यांना शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची ही शक्यता आहे. यामुळे मुलाच्या प्रचारासाठीच सुनेत्रा पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असल्याचे ही बोललं जात आहे. लोकसभेच्या निवडणुका आता जवळच आलेल्या आहेत. शिरूर मतदार संघ कोणाच्या पारड्यात पडतो हे पाहणं आता औत्सुक्याचं असेल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.