शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हवे होते, त्यानुसार अडीच वर्षे झाली, आता भाजपमध्ये जायला काय हरकत आहे, असा थेट सवाल शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी वृत्त वाहिन्यांशी बोलताना केला.
पुढेही शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असेल तर भाजपसोबत चर्चा करावी
आम्ही आजही उद्धव ठाकरे यांना आमचा नेता समजतो, मात्र त्यांनी आम्हाला नाकारले आहे. शिवसेनेने भाजपसोबत नैसर्गिक युती करावी, असा आमचा आग्रह आहे. मात्र तरीही उद्धव ठाकरे हे मान्य करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, यात पुढील अडीच वर्षांतही शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर तसे त्यांची चर्चा करावी, अन्यथा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमचा गट पुढील निर्णय घेईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, अशी ईच्छा होती, त्यामुळे उद्या मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातील नव्हे तर सामान्य शिवसैनिक व्हावा, असे अपेक्षित होते, असेही आमदार केसरकर म्हणाले.
(हेही वाचा Hindusthan Post Impact : महाविकास आघाडी सरकारच्या ‘जीआर’चा मुद्दा पहिला ‘हिंदुस्थान पोस्ट’नेच उजेडात आणला!)
एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवता येत नाही
आमच्या गटाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अवैध ठरवू शकत नाहीत. कारण पक्षातील दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ आमच्या गटाकडे आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र गट स्थापन करूच, तसेच गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांनाही हटवू शकत नाही, कारण सर्व आमदारांनी मिळून त्यांची निवड केली होती, आता त्यांच्याकडे अत्यंत कमी संख्येने आमदारांचे संख्याबळ आहे. तेवढ्या संख्याबळाने ते एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवू शकत नाही, असेही केसरकर म्हणाले. आम्ही झिरवळ यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे, असेही आमदार केसरकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community