नवी मुंबईत राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांचा धक्का, माजी नगरसेवकांसह तालुकाध्यक्ष शिंदे गटात

173

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर शिंदे गटात शिवसेनेतील नेते आणि पदाधिका-यांचं इनकमिंग सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी धक्का दिला आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या दोन माजी नगरसेवकांसह 10 तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आता शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीची अवस्था बिकट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह 10 तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवी मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केल्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादीची अवस्था खिळखिळी झाली आहे. गणेश नाईक यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळी नवी मुंबई महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. पण आता त्यांच्या पाठोपाठ माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह इतर पदाधिका-यांनी देखील पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रवादीसमोर आव्हान

दरम्यान, आगामी मुंबई महापालिका तसेच इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाने ठाणे,मुंबई आणि नवी मुंबईवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या शहरांत पक्ष वाढवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतही उद्धव ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा आगामी निवडणुकांमध्ये मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.