मुंबई पोलिस आयुक्त बदलण्यावरुन ठाकरे सरकारमध्ये दोन गट?

सचिन वाझे प्रकारणावरुन मुंबई पोलिस आयुक्तांचा राजीनामा घेणार की त्यांनाच पुन्हा आयुक्तपदी ठेवणार, हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

राज्यात सध्या सचिन वाझे प्रकारणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाकरे सरकार सध्या विरोधकांच्या रडारवर आहे. त्यातच आता मुंबई पोलिस आयुक्त बदलण्यात येणार अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र हिंदुस्थान पोस्टला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा राजीनामा तयार असून, तो स्वीकारायचा की नाही यावरुन ठाकरे सरकारमध्ये दोन गट तयार झाले आहेत. एका गटाचे असे म्हणणे आहे की, मुंबई पोलिस आयुक्तांचा राजीनामा घेतला तर ठाकरे सरकारची अधिक बदनामी होऊ शकते, तर एका गटाचे असे म्हणणे आहे की, आयुक्तांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण शांत करावे. त्यामुळे सचिन वाझे प्रकारणावरुन मुंबई पोलिस आयुक्तांचा राजीनामा घेणार की त्यांनाच पुन्हा आयुक्तपदी ठेवणार, हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे.

ठाकरे सरकारच्या मॅरेथॉन बैठका

विशेष बाब म्हणजे दोन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर नेत्यांची सकाळी १० वाजता बैठक बोलावली आहे. बैठकीत पोलिस दलातील खांदेपालटाबाबत पुन्हा चर्चा सुरू आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचीही वाझे प्रकरणावर मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद दाराआड चर्चा झाली.

(हेही वाचाः वाझे प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या जोर‘बैठका’!)

गृहमंत्री, पोलिस आयुक्तांबाबत काय म्हणाले पवार?

गृहमंत्री अनिल देशमुख हे प्रकरण सक्षमपणे हाताळण्यात कमी पडले असून, त्यांना पदावरुन हटवावे अशी मागणी होऊ लागली. याबद्दल शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी गृहमंत्रालयाने उचललेल्या पावलामुळे अनेक मुद्दे समोर आल्याचा दावा केला आहे. पोलिस आयुक्तांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोला तेच या प्रकारचे निर्णय घेत असतात, असे शरद पवार यांनी सांगितले.

(हेही वाचाः वाझेंमुळे सरकार अडचणीत येत नाही!! – शरद पवार )

यांची नावे चर्चेत

परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हटवले तर मुंबई पोलिस आयुक्त पदाच्या शर्यतीत काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये रजनीश शेठ, सदानंद दाते, विवेक फणसळकर, जयदीप सिंग, बी. के. उपाध्याय, डॉ. के. वेंकटेशम यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

(हेही वाचाः मुंबई पोलीस आयुक्त पदी कोण? रजनीश सेठ की सदानंद दाते?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here