वीज बिलावरून ठाकरे सरकारचा यु-टर्न, अजित पवारांनी ‘तो’ निर्णय घेतला मागे!

महावितरण कंपनीवरचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वीज बिल कपात करून दिलासा देणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज बिल संदर्भात निर्णय घेऊन सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. त्यानंतर देखील राज्य सरकारने वीज बिल कपाती संदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याने वीज बिल ग्राहकांची घोर निराशा झाली.

महावितरण कंपनीवरचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वीज बिल कपात करून दिलासा देणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच याआधीच वीज बिल संदर्भात 45 हजार कोटींची बाकी ग्राहकांकडे असताना, सरकारने 45000 कोटींपैकी पंधरा हजार कोटींचा दंड माफ केलेला आहे. यासोबतच पंधरा हजार कोटींच्या वीज बिलावर सूट दिलेली आहे. त्यामुळे केवळ पंधरा हजार कोटी एवढीच रक्कम आता वीज बिल ग्राहक आणि कृषिपंप शेतकऱ्यांना द्यावयाची आहे. सरकारने आधीच हा निर्णय घेतला असून, सामान्य नागरिकांना वीज बिलासंदर्भात दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.

वीज बिलाचे आश्वासन सरकारने पाळले नाही! – फडणवीस

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वीज बिलासंदर्भात विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. मात्र या अधिवेशनात वीज बिलासंदर्भात विरोधक आणि सत्ताधारी बसून मार्ग काढतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिल्यानंतर विरोधकांनी वीज बिलाबाबत समंजस्याची भूमिका घेतली होती. पण अधिवेशन संपल्यानंतरही आपले आश्वासन सरकारने पाळले नसल्याने या मुद्द्यावर विरोधक येणाऱ्या काळात आंदोलन सुरू ठेवेल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

(हेही वाचा : सचिन वाझे ओसामा बिन लादेन आहे का? मुख्यमंत्री विरोधकांवर संतापले!)

काय होता निर्णय?

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुद्धा वादळी झाली होती. प्रश्न-उत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीचा मुद्दा उपस्थितीत केला होता. ५७ खाली नोटीस देऊन फडणवीस यांनी  घरगुती, शेतकरी वीज पंप कनेक्शन तोडल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत ‘लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते, पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्यावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडकाम थांबवले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही वीज बिलाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे मत व्यक्त केले होते. तसेच जे काही वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘वीज कनेक्शन तोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, ती थांबवण्यात येणार आहे. ऊर्जा विभागाकडून याची सविस्तर माहिती दिली जाईल, तोपर्यंत वीज कनेक्शन तोडण्याचे काम थांबवण्यात येत आहे’, अशी घोषणा केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here