केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश यांनी ऐन उमेदीच्या वयात राजकीय संन्यास घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते गेल्या ३ वर्षांपासून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून तयारी करीत होते. मात्र, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी राणेंच्या विरोधात उबाठा गटाचे (UBATHA) आमदार वैभव नाईक यांना बळ देण्यास सुरुवात केल्याने त्यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत नाईक हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
एकेकाळी कुडाळ-मालवण हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र, २०१४ साली शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केल्यापासून ते विधानसभा निवडणुकीपासून अलिप्त राहिले. शिवसेनेतील फुटीनंतर वैभव नाईक उबाठा गटासोबत (UBATHA) राहिल्याने त्यांच्या विरोधात निलेश राणे यांना उतरवण्याची तयारी राणे कुटुंबीयांनी केली होती. गेल्या ३ वर्षांपासून स्वतः निलेश आणि त्यांची फौज या मतदारसंघात सक्रीय होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना, अजित पवार गट आणि भाजपाच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर आपण बाजी मारू, असा विश्वास त्यांना होता. परंतु, विद्यमान पालकमंत्र्यांनी त्यांच्या मार्गात आडकाठी आणली. आंगणेवाडीच्या यात्रेतील मानापमान नाट्याची किनार त्याला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्यावर्षी आंगणेवाडीच्या जत्रेत भाजपाचा मेळावा आयोजित केला होता. त्यात देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. कोकणातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमधील लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर आणून चव्हाण यांनी ‘ही आपली ताकद आहे’, असे फडणवीसांना सांगितले होते. त्यावर नारायण राणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत, ‘ही गर्दी सहा महिन्यांची नव्हे, तर गेल्या ३३ वर्षांपासून मी गावागावात, घराघरापर्यंत पोहचलो, म्हणून ही गर्दी जमली आहे’, अशा शब्दांत कान टोचले होते. ही बाब चव्हाण यांना खटकली होती. तेव्हापासून त्यांनी राणे कुटुंबीयांच्या पायात पाय घालण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपाकडून काय ऑफर ?
– निलेश राणे यांना लोकसभा वा विधानसभेला सिंधुदुर्गातून विजय मिळणार नाही, असा कौल भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय बैठकीत दिला होता. हाच धागा पकडत रवींद्र चव्हाण यांनी राणेंच्या विरोधात वैभव नाईक यांना बळ देण्यास सुरुवात केली. गेल्या पाच-सहा महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा भेटीगाठी झाल्या.
– उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल केल्यानंतर त्यात आपल्याला उपनेते पदाची जबाबदारी मिळेल, अशी अपेक्षा वैभव नाईक यांना होती. मात्र, त्यांच्या निष्ठेची ठाकरेंकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. ही बाब हेरून चव्हाण यांनी भाजपाच्या राज्यातील एका वरिष्ठ नेत्याशी वैभव नाईक यांची गुप्त भेट घडवून आणली.
– वैभव नाईक यांनी आगामी निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढावी, असा प्रस्ताव यावेळी त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. इंडिया आघाडीचे भवितव्य आणि महायुतीची वाढती ताकद, याचा अंदाज घेऊन नाईक यांनी या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला असून, येत्या काळात ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली.