CM Eknath Shinde :  तिथे आदित्य इथे श्रीकांत; ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतही ‘शिंदे’शाही

आक्रमक भाषणांनी सभा गाजवणाऱ्या रामदास कदम, गुलाबराव पाटील यांना लोकसभेच्या प्रचारापासून काही वेळा बाजूलाच ठेवण्यात आले.

148

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करीत वेगळी चूल मांडणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत घराणेशाही सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात १२६ निरीक्षक आणि प्रत्येक जिल्ह्यात ३ प्रभारी नेमले. मात्र, पक्ष निरीक्षकांनी थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनाच अहवाल द्यावा, असे फर्मान काढले आहे. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांमध्ये यामुळे धुसफूस वाढली आहे.

सहकाऱ्यांना बाजूला ठेवले 

लोकसभेत शिवसेनेने १५ जागा लढवून ७ जागा निवडून आणल्या. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पायाला भिंगरी लावून यावेळी प्रचार केला. आक्रमक भाषणांनी सभा गाजवणाऱ्या रामदास कदम, गुलाबराव पाटील यांना लोकसभेच्या प्रचारापासून काही वेळा बाजूलाच ठेवण्यात आले. शिंदेच्या कर्तृत्वामुळे लोकसभेत शिवसेनेला मोठे यश मिळाले. आता विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिंदे यांनी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदार संघनिहाय आढावा घेतला. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकण्याचा निश्चय शिंदेंनी करताना, पक्षाचे १२६ निरीक्षक आणि प्रत्येक जिल्ह्यात ३ प्रभारी नेमण्याचे आदेश दिले. संघटनात्मक बांधणीसोबत मतदारसंघाचे सर्वेक्षण, सदस्य नोंदणीवर भर द्या, महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना तळागळात पोहोचवा, निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडी, प्रचार आणि प्रतिसादाबाबत सातत्याने लक्ष ठेवा. शिवसेनेने आखलेल्या रणनीतीवर ठोस अंमलबजावणी करावी. तसेच या संदर्भातील अहवाल विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि प्रभारी यांनी पक्षातील इतर कोणत्याही नेत्याकडे न देता एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाच सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.

(हेही वाचा कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या Samajwadi Party चे खासदार मातोश्रीवर; सोशल मीडियावर टिकेची झोड)

श्रीकांत शिंदेंची पक्षात ढवळाढवळ   

शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडात अनेक वरिष्ठ नेते सामील झाले. उद्धव ठाकरेंनी पक्षात घराणेशाही सुरू केल्याचा ठपका त्यावेळी ठेवला होता. मात्र अवघ्या दोन वर्षातच शिंदे यांनी पक्षातील सर्व सूत्र स्वतः आणि मुलगा श्रीकांत शिंदेकडे ठेवली आहेत. गेल्या वर्षभरापासून श्रीकांत शिंदे यांची पक्षात ढवळाढवळ सुरू होती. अनेकदा वरिष्ठांना डावलून त्यांनी परस्पर निर्णय सुध्दा घेण्याचा प्रयत्न केला. शिंदेंकडे तक्रार केल्यानंतर पांघरून घातले. अखेर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर शिंदेंनी त्यावर शिक्कामोर्तब केले. ठाकरेंना सोडून आलेल्या वरिष्ठ नेत्यांचा किमान विचार व्हायला हवा होता, अशी खंत एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.