शिवसेना पक्षाच्या वतीने वक्फ विधेयकाला (Waqf Amendment Bill 2025) पाठिंबा देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतो. हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. आधी कलम 370, नंतर तिहेरी तलाक आणि सीएए आणि आता गरिबांच्या कल्याणासाठी हे विधेयक या सभागृहात आणले गेले आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की, अरविंद सावंत यांनी आज हिरवे जॅकेट बुधवारसाठी घातले आहे की, वक्फसाठी घातले आहे. यूबीटी शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या अंतरआत्म्याला विचारावे की जर आज बाळासाहेब असते तर असे भाषण तुम्ही केले असते का?, असा सवाल थेट विचारला.
बुधवार, २ एप्रिलला वक्फ सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मांडले. त्यावेळी चर्चेत सहभाग घेताना खासदार शिंदे म्हणाले, अरविंद सावंत यांचे भाषण ऐकून मला खूप वाईट वाटले. यूबीटी शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या अंतरआत्म्याला विचारावे की, जर आज बाळासाहेब असते तर असे भाषण तुम्ही केले असते का? आज हे स्पष्ट झाले आहे की, यूबीटी कोणाच्या विचारसरणीचे पालन करत आहे आणि या विधेयकाला (Waqf Amendment Bill 2025) विरोध करत आहे. तुमच्याकडे चुकांना सुधारण्याची सुवर्णसंधी होती. स्वतःची विचारधारा जिवंत ठेवण्याचा, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन केले होते. पण यूबीटीने ती विचारधारा आगोदरच बुलडोझरखाली चिरडली आहे.
बाळासाहेबांची विचारधारा स्पष्ट होती. हिंदुत्वाची रक्षा, देशाची एकता आणि अन्य धर्मियांसाठी सन्मान ही त्यांची विचारधारा होती. आज बाळासाहेब इथे असते आणि त्यांनी उबाठाचे भाषण वाचले असते तर त्यांच्या आत्म्याला त्रास झाला असता, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. उबाठाने वक्फ बोर्डात गैर मुस्लीम सदस्य नको, अशी मागणी केली आहे. त्याची त्यांनी इथे वकिली केली. बाळासाहेब फक्त हिंदुत्वासाठी लढले. मला वाटतंय ठाकरे गटाला फक्त हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. आज ठाकरे गट औरंगजेबाच्या विचारावर चालतोय. ते औरंगजेबाची वकिली करत आहेत. यांनी पालघरमधील साधू हत्याकांडावर कधी पत्र लिहिले नाही. आज औरंगजेबाचा मुद्दा निघाला तर यांची अस्वस्थता वाढली आहे, असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
काँग्रेसने शहाबानो यांचा हक्क हिरावून घेतला
वक्फच्या नावाखाली ज्या गरीब मुस्लिमांचा अधिकार हिसकावण्यात आला त्यांच्यासाठी हे विधेयक (Waqf Amendment Bill 2025) आधार आहे. विरोधकांनी त्यांचा कायम व्होटबँक म्हणून वापर केला. शहाबानो प्रकरणात न्यायालयाने त्यांना न्याय दिला. पण, काँग्रेसने त्यांचा हक्क हिरावून घेतला. मुस्लीम समाजाच्या विकासासाठी सादर केलेल्या सच्चर आयोगाच्या शिफारशींवर आठ वर्ष काँग्रेस सरकारने अंमलबजावणी केली नाही. ‘इंडी’ आघाडीचे सर्व घटकपक्ष या विधेयकाला (Waqf Amendment Bill 2025) विरोध करत आहेत. पण, याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी वक्फमधील घोटाळ्याची आपल्या कार्यकाळात करण्याची मागणी केली होती. वक्फच्या जमिनी लाटण्याचे काम विरोधकांच्या राजवटीमध्ये झाले, असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community